गुंतवणूकदारांची १८ कोटी २९ लाखांची फसवणूक, मार्केटिंगच्या टोळीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:06 AM2019-10-05T03:06:21+5:302019-10-05T03:06:37+5:30
दिवसाला एक टक्क्याप्रमाणे ४०० दिवसांत ४०० टक्के नफ्याचे आमिष दाखवून बेकायदेशीरपणे ठेवी जमा करणाऱ्या मल्टीलेवल मार्केटिंग कंपनीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
नवी मुंबई : दिवसाला एक टक्क्याप्रमाणे ४०० दिवसांत ४०० टक्के नफ्याचे आमिष दाखवून बेकायदेशीरपणे ठेवी जमा करणाऱ्या मल्टीलेवल मार्केटिंग कंपनीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी कंपनीतील सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून वापरण्यात आलेली विविध बँकेतील ३३ खाती गोठवण्यात आली आहेत. तुर्भेतील एस. के. व्हील्सच्या इमारतीमध्ये भाडोत्री जागेत या कंपनीचे कार्यालय चालत होते.
नागरिकांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून, गुंतवणूक करून घेणारी कंपनी दोन महिन्यांपासून सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपआयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी आर्थिक शाखा कक्ष १ चे वरिष्ठ निरीक्षक श्याम शिंदे यांचे तपास पथक नेमले होते. तुर्भे एमआयडीसी येथील एस. के. व्हील्सच्या इमारतीमध्ये ए. एम. पिक्चर्स नावाची मार्केटिंग कंपनी चालू होती. त्यानुसार पथकांमार्फत माहिती काढण्यात आली असता, नागरिकांना तीन हजार ते दहा लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्यास सांगितले जात असल्याचे समोर आले.
दोन महिन्यांत दहा हजार २४० जणांनी कंपनीत आॅनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी पाच हजार १७० जणांनी प्रत्यक्ष गुंतवणूक केली होती. त्यांच्याद्वारे जमा झालेली रक्कम १८ कोटी २९ लाख १९ हजार रुपये असल्याचे कारवाईनंतर तपासात समोर आल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी सहआयुक्त राजकुमार व्हटकर, उपआयुक्त प्रवीणकुमार पाटील, पंकज डहाणे, सहायक आयुक्त अजय कदम आदी उपस्थित होते. एकूण गुंतवणूकदारांपैकी पहिल्या टप्प्यातील ३,४२६ गुंतवणूकदारांना नफ्याच्या स्वरूपात २ कोटी ४८ लाख ५९ हजार ५९३ रुपये वाटण्यात आले. यामुळे त्यांच्याकडून तोंडी प्रसिद्धी मिळत गेल्याने गुंतवणूकदारांचा आकडा वाढला. गुंतवणूक करून घेतल्यानंतर नफा कशा दिला जाईल याचा कसलाही आराखडा कंपनीकडे नव्हता. शिवाय आरबीआयच्या परवान्यासह इतर कोणताही परवाना त्यांच्याकडे नव्हता. त्यानुसार कंपनीचा उद्देश शुद्ध नसल्याचे उघड होताच सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गणेश भवनम (३४), लोनाचन कुरीअपुराम (५०), किशोर रोकडे (४६), अंकुश अहेर (५०) व एम. एस. रमेश (३४), रमेश माने (४९) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी गणेश भवनम हा कंपनीचा संचालक असून, सहकारी रवि रामकुमार वर्मा या दोघांच्या नावाने कंपनीची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यांच्या कार्यालयातील संगणक व इतर महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
ए. एम. पिक्चर्स कंपनीवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. त्यापैकी काही कागदपत्रांवर एस. के. ग्रुप पी.टी.सी. असाही उल्लेख असल्याने त्यामध्ये या ग्रुपचाही काही संबंध आहे का? याचाही तपास केला जात असल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले.
अटक केलेल्या सहा जणांवर यापूर्वीही वेगवेगळ्या स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून नागरिकांना गुंतवणुकीला भाग पाडण्यासाठी १६ लिडर नेमण्यात आले होते. त्यांच्यामार्फत ठिकठिकाणी सेमिनार घेऊन नागरिकांना जादा नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीला भाग पाडले जात होते.