कलिंगडाच्या शेतात गांजाची १८० झाडं, पोलिसांनी केली शेतकऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:35 PM2023-03-10T12:35:47+5:302023-03-10T12:55:31+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांनी उजनी (मा) लोकरे यांच्या कलिंगडच्या शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली होती.
सोलापूर/कुर्डुवाडी - कलिंगडाच्या शेतामध्ये लावलेली १४ लाख ३२ हजार रुपयांची १२० गांजाची झाडे कुर्डुवाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई उजनी (मा) ता. माढा येथे अभिमान लोकरे (वय ५५) यांच्या शेतामध्ये करण्यात आली. पोलिसांनी गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यास अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांनी उजनी (मा) लोकरे यांच्या कलिंगडच्या शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी गांजाची १२० झाडे जप्त केली आहे. याचे वजन १४१ किग्रॅ इतके आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, पोलिस हेडकॉन्स्टेबल पाटील, पोलिस नाईक कांबळे, पोलिस नाईक शिंदे, ठोंगे, पवार, चाकणे यांनी केली आहे. दरम्यान अटक केलेल्या आरोपीस पोलिसांनी माढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. व्ही. गांधे यांनी आरोपीस दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गांजाची झाडे जप्तीची पहिलीच वेळ
गांजाची झाडे पोलिसांनी जप्त करण्याची ही माढा तालुक्यातील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले. कुईवाडी पोलिस ठाण्याचे नवीन पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी मोठी कारवाई केल्यामुळे परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.