सिद्धू मूसेवाला हत्याकांडात 1850 पानांचे आरोपपत्र; हत्येत 24 कुख्यात गुन्हेगारांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 07:59 PM2022-08-26T19:59:49+5:302022-08-26T20:00:25+5:30
चार्जशीटमध्ये या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टरमाइंड गँगस्टर लॉरेंस बिश्नोई असल्याचे म्हटले आहे.
पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणी मानसा पोलिसांनी 1850 पानांचे सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात एकूण 36 पैकी 24 आरोपींची नावे आहेत. या हत्येचा सूत्रधार गँगस्टर लॉरेन्सच्या नावाचाही आरोपपत्रात समावेश आहे. यासोबतच या प्रकरणात परदेशात बसलेल्या गोल्डी ब्रार, सचिन थापन, लिपिन नेहरा आणि अनमोल या चार गुंडांचीही नावे जोडली गेली आहेत.
पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या सविस्तर आरोपपत्रात 122 साक्षीदारांच्या जबाबांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हत्येवेळी तेथे उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी, हत्येवेळी तेथे उपस्थित असलेले मित्र, मुसेवालाचे पोस्टमार्टम करणारे डॉक्टर, ज्या हॉटेलमध्ये आरोपी थांबले, त्या हॉटेलचे कर्मचारी अशा अनेकांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 2 शूटर्सचे एन्काउंटर झाले आहे.
लॉरेन्स बिश्नोई पंजाब पोलिसांच्या ताब्यात
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांची नावे समोर आली आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे तर गोल्डी ब्रार कॅनडात असल्याची माहिती आहे. इंटरपोलने गोल्डी ब्रारला रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. तर, मूसवाला खून प्रकरणात नाव समोर आल्यानंतर पंजाब पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांचा तपास सुरुच
एका मोठ्या कटाचा भाग म्हणून मुसेवाला यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मानसाचे एसएसपी गौरव तुरा म्हणाले, एसआयटी या संपूर्ण कटाचा शोध घेण्यात व्यस्त आहे. मुसेवाला यांचे जुने वैमनस्य होते का, यातूनच त्यांची हत्या करण्यात आली आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहत. विशेष म्हणजे, परदेशात असलेल्या आरोपींच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे.