बनावट दस्ताऐवजाद्वारे वारस भासवून १८.७५ लाख ट्रान्सफर, तिघांवर गुन्हा
By नरेश रहिले | Published: November 28, 2023 05:14 PM2023-11-28T17:14:50+5:302023-11-28T17:16:48+5:30
रक्कम दान दिल्याचे भासवणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नरेश रहिले, गोंदिया: शहराच्या आशिर्वाद कॉलनी येथील तिघांनी खोटा व बनावट अभिलेख तयार करून एसडीओ यांना सादर केला. त्यात माधोप्रसाद मतलानी यांच्या वारस असल्याचे दाखवून माधोप्रसाद मतलानी यांच्या सर्व प्रॉपर्टी मधून तमन्ना उर्फ ममता सुरेशकुमार मतलानी (४३) यांचे नाव वगळले आणि त्यांच्या बँक खात्यातून १८ लाख ७५ हजार ५५० रुपये आरोपींनी स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले.
तमन्ना उर्फ ममता मतलानी यांनी त्यांना दान दिल्याचे भाषवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना २० डिसेंबर २०१६ ते ७ जुलै २०२३ यादरम्यान घडली. यासंदर्भात आरोपी ईश्वरीबाई माधोप्रसाद मतलानी (७८), राजकुमार माधोप्रसाद मतलानी (५५), संजय माधोप्रसाद मतलानी (४४) तिन्ही रा. आशिर्वाद कॉलनी फुलचूरटोला गोंदिया या तिघांवर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १७७, १९९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम करीत आहेत.