बनावट कागदपत्रांच्या आधारे १९ कोटींचा गंडा; जीएसटी विभागाने केली एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 09:02 AM2022-08-01T09:02:44+5:302022-08-01T09:02:53+5:30
खोटी कागदपत्रे सादर करून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून फसवणूक करणाऱ्यांविरोधात जीएसटी विभागाने मोहीम सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मेसर्स ओमनिपोटंट इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालकाने जीएसटी विभागाला बनावट कागदपत्रांच्या आधारे १९ कोटी ५१ लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी संस्थेच्या मुख्य सूत्रधारास अटक केली असून, न्यायालयाने संबंधित संचालकाला १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
खोटी कागदपत्रे सादर करून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून फसवणूक करणाऱ्यांविरोधात जीएसटी विभागाने मोहीम सुरू केली आहे. २०२१- २२ या वर्षात नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ५४३ कोटींची जीएसटी चोरी उघडकीस आणली आहे. यातील ४१ कोटी ४७ लाख वसूल केले असून, आतापर्यंत १६ जणांना अटक केली आहे.
१२० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या पावत्या
मेसर्स ओमनिपोटंट लिमिटेडच्या संचालकांनी वस्तू व सेवांचा पुरवठा न करता तब्बल १२० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या पावत्या सादर केल्या होत्या. या आधारे त्यांनी १९ कोटी ५१ लाख रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविला होता. याप्रकरणी जानेवारी २०२२ मध्ये दोघांना अटक केली होती; परंतु या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या कंपनी संचालक सात महिने फरार होता. त्यास जीएसटी विभागाने शुक्रवारी अटक केल्याची माहिती जीसीएसटी आयुक्त प्रभात कुमार यांनी दिली.