एअरपोर्टमध्ये नोकरीचं आमिष, १९ वर्षीय मुलीवर अत्याचार; रीलस्टारचा आणखी एक कांड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:32 IST2025-04-04T17:31:24+5:302025-04-04T17:32:09+5:30
सुरेंद्र पाटील हा बांधकाम व्यावसायिक असून तो रीलस्टार आहे. त्याचे रील अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

एअरपोर्टमध्ये नोकरीचं आमिष, १९ वर्षीय मुलीवर अत्याचार; रीलस्टारचा आणखी एक कांड
डोंबिवली - एअर होस्टेस म्हणून आधी काम केलेल्या पुण्यातील एका १९ वर्षीय तरुणीला मुंबई एअरपोर्टमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवित तिच्यावर बंदुकीच्या धाकाने लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली रीलस्टार सुरेंद्र पाटील याच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणीने नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत एका विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम केले होते.
रीला पसंती देताच सुरेंद्रने मागवली माहिती
तरुणीची जानेवारी २०२५ मध्ये सुरेंद्र याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. पाटीलच्या एका रीला तिने पसंती दर्शवल्यानंतर लागलीच त्याने तिला मेसेज करून तिच्याविषयी सर्व माहिती जाणून घेतली. तिने एअर होस्टेसचे काम केल्याचे माहिती झाल्याने त्याने १३ फेब्रुवारीला फोन करून तिला तुम्ही कागदपत्रे घेऊन या, तुम्हाला मुंबई एअरपोर्टमध्ये नोकरी देतो असं सांगितले. त्यामुळे पीडित तरुणई नोकरीच्या आशेने १६ फेब्रुवारीला पाटील याला भेटायला गेली.
बंदुकीचा दाखवला धाक
कळंबोलीमध्ये असलेल्या पाटील याने माझे ऑफिस डोंबिवलीत आहे तेथे जाऊ असं सांगत तो तिला डोंबिवलीत घेऊन आला. घरात गेल्यावर बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रारी म्हटलं. ती पुण्याला निघून गेल्यावर २५ मार्चला पुन्हा फोन करून लैंगिक अत्याचारा व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देत पुन्हा तिला डोंबिवलीत बोलावून घेतले आणि तिच्यावर जबरदस्ती केली.
बऱ्याचदा सापडलाय वादात
सुरेंद्र पाटील हा बांधकाम व्यावसायिक असून तो रीलस्टार आहे. त्याचे रील अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. त्याला १८ महिन्यांसाठी तडीपारही केले होते. एकदा पोलिसांच्या खुर्चीत बसून त्याने व्हिडिओ शूट केला तो वादात अडकला. त्याशिवाय हातात बंदूक घेऊन भरपूर रक्कम समोर ठेवूनही त्याने रील्स बनवले आहेत. दरम्यान, बलात्कार प्रकरणी पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.