महिलांनो अपरिचिताकडून ‘टास्क’ घेताय! उच्चशिक्षित तरुणीला १.९३ लाखांना गंडा
By योगेश पांडे | Published: July 27, 2023 02:05 PM2023-07-27T14:05:20+5:302023-07-27T14:25:43+5:30
टास्कच्या नावाखाली आरोपीने तिच्याकडून काही रक्कम घेतली व टास्क पूर्ण झाल्यावर तिला कमिशन पाठविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘टास्क’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका उच्चशिक्षित तरुणीला १.९३ लाखांना गंडा घातला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
भारती नावाची तरुणी एका नामांकित कंपनीत एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहे. ती लवकरच लग्नदेखील करणार आहे. तरुणी पार्ट टाईम जॉबच्या शोधात होती. गुगलच्या एका संकेतस्थळावर तिला ८९३८०८१७०६ हा मोबाईल क्रमांक मिळाला व त्यावर तिने फोन लावला. समोरील व्यक्तीने तिला टेलिग्रामची लिंक पाठविली. त्यावर तिचा आयडी तयार करण्यात आला व तिचे बॅंक खाते लिंक करण्यात आले.
टास्कच्या नावाखाली आरोपीने तिच्याकडून काही रक्कम घेतली व टास्क पूर्ण झाल्यावर तिला कमिशन पाठविले. फायदा होत असल्याचे पाहून भारतीचा या प्रक्रियेवर विश्वास बसला. त्यानंतर तिला मोठ्या रकमेचे टास्क देण्यात आले. तिनेदेखील पैसे जमा केले व पोर्टलवर तिला तिची रक्कम तसेच झालेला फायदा दिसत होता. सगळे टास्क पूर्ण झाल्याशिवाय रक्कम काढू शकत नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे तरुणीला शंका आली. तिने वारंवार पैसे परत मागितले. मात्र समोरील व्यक्तीने नकार दिला.
आरोपींनी मोबाईल क्रमांक बंद केला व पोर्टलदेखील ब्लॉक केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरूणीने बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.