1993 Mumbai Bombing : १९९३च्या बॉम्बस्फोटातील मुनाफला विमानतळावर अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 06:16 AM2020-02-11T06:16:11+5:302020-02-11T06:16:37+5:30

1993 Mumbai Bomb Blast : गुजरात एटीएसची कारवाई; मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर दोनदा आला होता भारतात

1993 bombing criminal munaf Arrested at airport | 1993 Mumbai Bombing : १९९३च्या बॉम्बस्फोटातील मुनाफला विमानतळावर अटक

1993 Mumbai Bombing : १९९३च्या बॉम्बस्फोटातील मुनाफला विमानतळावर अटक

googlenewsNext

मुंबई : मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांतील आरोपी मुनाफ हलारी याला गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबई विमानतळावरून रविवारी रात्री अटक केली. तो पाकिस्तानी पासपोर्टवर मुंबईतून दुबईला जात असताना ही कारवाई करण्यात आली.


गुजरात एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त के. के. पटेल यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातून गुजरात समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणात हेरॉईन तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती होती. त्यानुसार, २ जानेवारीला गुजरात एटीएसने दीड हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्जसह पाच पाकिस्तानी तस्करांना अटक केली. या आरोपींच्या चौकशीत मुनाफचे नाव समोर येताच तो गुजरात एटीएसच्या रडारवर आला. पथकाने त्याचा शोध सुरू केला.
१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत दोन तासांतच १२ ठिकाणी स्फोट झाले. स्फोटांत २५७ जणांचा मृत्यू झाला. तर ७१३ जखमी झाले होते. या भीषण स्फोटांसाठी टायगर मेमनचा खास हस्तक असलेल्या मुनाफने तीन दुचाकी पुरविल्या. यातील एका स्कूटरच्या साहाय्याने झवेरी बाजारात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. तर, अन्य दोन स्कूटर मुंबईतील निगम क्रॉस रोड आणि दादर येथे सापडल्या होत्या. तपासयंत्रणा त्याच्या मागावर होत्या. मात्र मुनाफ त्यांच्या हाती लागला नाही. केंद्रीय तपास यंत्रणेने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली होती.


रविवारी रात्री तो मुंबई विमानतळावरून पाकिस्तानी पासपोर्टच्या आधारे दुबईला जाणार असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळताच त्यांनी सापळा रचून, त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीत, मुंबई बॉम्बस्फोटांनतर मध्य प्रदेशमधील बरेलीमार्गे तो बँकाँकला आला.


मेमनने त्याच्यासाठी पाकिस्तानी यंत्रणांच्या मदतीने अब्दुल मोहम्मद नावाने पाकिस्तानी पासपोर्टसुद्धा बनविला. पुढे, टायगर मेमनच्या सतत संपर्कात असलेला मुनाफ केनियाच्या नैरोबीमध्ये मग्नुम आफ्रिका नावाने ओळख लपवून राहू लागला. मेमनच्या सांगण्यावरून धान्य आयात-निर्यातीचा व्यवसाय सुरू केला. याआडून तो भारतात ड्रग्ज, स्फोटकांची तस्करी करीत असे. २ जानेवारीला गुजरात एटीएसने पकडलेल्या ड्रग्जसाठी मुनाफने कराचीतील हाजी हसनला हे ड्रग्ज भारतात पाठविण्याचे काम सोपविल्याचे समोर आले. त्यानुसार, गुजरात एटीएस तपास करीत आहेत.

मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर पसार झालेला मुनाफ दोन वेळा भारतात आल्याची धक्कादायक माहिती गुजरात एटीएसच्या कारवाईतून समोर आली. २०१४ मध्ये अतारी सीमेवरून तो भारतात येऊन पुढे मुंबईत आला. गुजरात एटीएसने त्याच्याकडून पाकिस्तानी पासपोर्ट जप्त केला असून, हा पासपोर्ट पाकिस्तानी यंत्रणेने दोनदा नूतनीकरण केला होता.

Web Title: 1993 bombing criminal munaf Arrested at airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.