आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने १ लाख रुपये घेऊन फसवणूक; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 01:01 PM2020-07-30T13:01:13+5:302020-07-30T13:03:33+5:30
मुख्य आरोपी हा चंद्रकांत पाटलांच्या आवाजात बोलत दादांचा पीए आहे असे समोरच्याला सांगायचा.
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने २ ते ३ लाख रुपयांची मागणी करुन १ लाख रुपये घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी एका मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे़
सुरेश बंडु कांबळे, सौरभ आष्टी, किरण धन्यकुमार शिंदे, किरण शेंडगे (सर्व रा़ गंज पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी हरीविलास रामनाथ कासट (वय ९०, रा. हर्षल बंगला, कोथरुड) यांनी अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. एका डॉक्टरकडे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार सर्व प्रथम प्रकार घडला असून याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना पकडले आहे. स्वत: चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना कोथरुडमधील कासट यांच्या घरी घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कासट यांना १७ जुलै रोजी एक फोन आला. फोन करणार्याने मी आमदार चंद्रकांत पाटील बोलतोय. तुमच्या कोथरुड भागातून मी निवडुन आलोय. सध्या कोरोना महामारीच्या काळामध्ये मी खूप मदत कार्य केले असून या पार्श्वभूमीवर तुम्ही मला २ ते ३ लाख रुपयांची आर्थिक मदत द्या असे बोलणे करुन पैशांची मागणी केली. त्यानंतर त्याने साथीदारांना पाठवून १ लाख रुपये देण्यास भाग पाडले.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, विशाल शेंडगे हा चंद्रकांत पाटील यांच्या आवाजात बोलत असे. सुरेश कांबळे हा दादांचा पी ए सावंत बोलत असल्याचे सांगत. त्यांनी अनेक प्रतिष्ठितांना फोन करुन पैशांची मागणी केली. परंतु, त्यापैकी अनेकांना राजकीय नेते असे स्वत: फोन करुन मागणी करीत नसल्याचे माहिती असल्याने त्यांनी त्यांच्या फोनकडे दुर्लक्ष केले होते.
सौरभ आष्टी व किरण शिंदे हे दोघे रेकी करत. कासट यांना चंद्रकांत पाटील यांनीच पैसे मागितल्याचे खरे वाटले होते. त्यामुळे त्यांनी आॅफिसमध्ये क्लार्कला आलेल्या तरुणाकडे पैसे देण्यास सांगितले होते.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने कोणाकडे पैशांची मागणी झाली असेल तर त्यांनी कोथरुड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील अधिक तपास करीत आहेत.