२ मित्र, १ प्रेयसी...! बदला घेण्यासाठी 'तो' १५०० किमी दूर आला अन् मित्राचाच काटा काढला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:55 AM2022-10-27T11:55:42+5:302022-10-27T11:55:54+5:30
३३ वर्षीय मनीष हा करोल बाग येथे मोबाईलचं दुकान चालवायचा. २१ ऑक्टोबरला मनीष अचानक गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली.
नवी दिल्ली - दिल्लीत मोबाईल व्यावसायिकाच्या हत्येने खळबळ माजली आहे. करोल बागेतील या व्यक्तीचा मृतदेह नाल्यात सापडला. या प्रकरणात पोलिसांनी मृतकाच्या मित्रासह २ जणांना अटक केली आहे. या हत्येमागे प्रेमाचा त्रिकोण असल्याचा खुलासा पोलिसांना तपासात आढळून आला आहे. मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत मैत्री केल्यानंतर नाराज झालेल्या मित्रानेच खून केल्याचं समोर आले आहे.
३३ वर्षीय मनीष हा करोल बाग येथे मोबाईलचं दुकान चालवायचा. २१ ऑक्टोबरला मनीष अचानक गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. मनीषच्या कुटुंबाने तो बेपत्ता असल्याचं सांगितले. त्यानंतर या प्रकरणाचा शोध सुरू झाला. तपासावेळी पोलिसांनी मनीषचा मृतदेह बेवारस अवस्थेत सापडला. त्यानंतर मनीषच्या हत्येचं गूढ वाढले. अपहरण करून मनीषची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलीस तपासानुसार, मृतकाचे कॉल डिटेल्स चेक केले असता २ नंबरवर तो सातत्याने बोलत असल्याचं दिसलं. पोलिसांनी त्या २ नंबरचा शोध घेतला तेव्हा मनीष बेपत्ता होण्याच्या अखेरपर्यंत ते सोबत असल्याचं पुढे आले. हा नंबर संजय आणि सीताराम यांचे असल्याचं कळालं. हे दोघंही राजस्थानच्या चुरू येथे राहणारे आहेत. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले त्यानंतर तपासावेळी दोघांनी दिलेला जबाब पोलिसांना हैराण करणारा होता. संजय हा शेअर ब्रोकरचं काम करतो आणि तो मनीषचा मित्र होता.
संजय आणि मनीष यांची एकाच मुलीसोबत घनिष्ट मैत्री होती. त्यामुळे संजय नाखुश होता. मनीषचा काटा काढण्याचा कट त्याने रचला. त्यानं मनीषला भेटण्यासाठी बोलावले. तेव्हा माझ्या गर्लफ्रेंडचा नंबर डिलीट कर असं त्याने मनीषला सांगितले. परंतु मनीषने त्यास नकार दिला. तेव्हा संजय संतापला होता. या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. संजयला मनीष आणि त्याच्या गर्लफ्रेंडची मैत्री आवडली नाही. २१ ऑक्टोबरला तो कोलकाताहून दिल्लीला आला त्याने दुसरा मित्र सीतारामलाही बोलावले.
या दोघांनी मनीषला सोबत घेत कारमधून गेले. तिथे तिघांनी भरपूर दारू प्यायली. त्यानंतर रस्सीने मनीषचा गळा दाबण्यात आला. जवळपास ३ तास दोघं मनिषचा मृतदेह घेऊन फिरत होते. त्यानंतर धौलाकुवा परिसरात असणाऱ्या नाल्यात मनिषचा मृतदेह फेकून ते मनिषची कार बेवारस अवस्थेत सोडून पळून गेले. पोलिसांनी जीपीएस लोकेशन्सद्वारे मनिषचा मृतदेह शोधून काढला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"