'पार्किंग' सिनेमाची काल्पनिक कहाणी खरी ठरली; क्षुल्लक वादातून २ मैत्रिणींची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 06:00 PM2024-08-08T18:00:48+5:302024-08-08T18:01:42+5:30
पार्किंगवरून झालेल्या वादातून २ मैत्रिणींची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना भुवनेश्वरला घडली आहे.
भुवनेश्वर - मागील वर्षी ओटीटीवर आलेला थ्रीलर ड्रामा फिल्म पार्किंग तुम्ही पाहिलाच असेल. या सिनेमातील २ पात्र यांच्यात पार्किंगवरून जोरदार भांडण होते त्यातून एकमेकांविरोधात षडयंत्र रचण्याची सुरुवात होते. परिस्थिती इतकी बिघडते त्यातून दोघे एकमेकांच्या हत्येचं प्लॅनिंग करतात. ही सिनेमाची स्क्रिप्ट आहे. मात्र हीच स्क्रिप्ट खऱ्या आयुष्यात घडल्याचं पुढे आले आहे.
माहितीनुसार, बुधवारी रात्री एका अपार्टमेंटमध्ये वाहन पार्किंगवरून झालेल्या भांडणात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना एअरफिल्ड ठाणे परिसरातील कल्याणी प्लाझाची आहे. मृतकांमध्ये रश्मी रंजन सेठी आणि तिची मैत्रिण संबित राऊत यांचा समावेश आहे. वाहन पार्किंगवरून झालेल्या वादातून दोन गटांमध्ये भांडण झाले त्यातून चाकू हल्ला झाला या हल्ल्यात २ महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र एकीने वाटेतच जीव सोडला तर दुसरीचा उपचारावेळी मृत्यू झाला अशी माहिती भुवनेश्वरचे डीसीपी प्रतिक सिंह यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
रश्मी आणि संबित या दोघी एका बिल्डिंगमध्ये राहत होत्या. दोघींचे शहरात पॉल्ट्री शॉप आहे. बुधवारी रात्री गणेश मलिकचा रश्मी आणि संबितसोबत पार्किंगवरून वाद झाला होता. चिकन काऊंटर बंद करून या दोघी घरी जात होत्या. तेव्हा वाटेतच गणेशनं त्याच्या ५ साथीदारांसोबत या महिलांवर हल्ला केला. हा हल्ला इतका गंभीर होता त्यात एकीचा रुग्णालयात घेऊन जाण्यापूर्वीच मृत्यू झाला तर दुसरीने उपचारावेळी जीव सोडला. या घटनेतील मुख्य आरोपी गणेशची पत्नी आणि इतर चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या दुहेरी हत्याकांडाचा आता तपास करत आहेत.
आरोपींना पकडण्यासाठी एका विशेष पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेबाबत मृत रश्मीचा चुलत भाऊ म्हणाला की, पार्किंगवरून झालेल्या क्षुल्लक वादातून ही हत्या झाली. नेहमी एकत्र राहणाऱ्या २ मैत्रिणीचा एकाचवेळी मृत्यू झाला. आमचा कायद्यावर विश्वास आहे. लवकरच पोलीस आरोपींना पकडतील आणि कारवाई होईल अशी अपेक्षा आहे असं त्याने सांगितले.