भुसावळमधील मण्णपुरम गोल्ड फायनान्समधून 2 किलो सोने लंपास; व्यवस्थापकावरच संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:17 AM2022-11-23T00:17:01+5:302022-11-23T00:17:32+5:30
सोने लंपास करण्याअगोदर आरोपीने बँकेतील सर्व सीसीटीव्हीचे कॅमेरे बंद केले होते असे निदर्शनास आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : शहरातील मण्णपुरम गोल्ड फायनान्समधून सुमारे दोन किलो सोने लंपास केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. या वित्तसंस्थेचा विशाल राॅय नावाचा मूळचा उत्तर प्रदेशातील व्यवस्थापकही बेपत्ता असून त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम बाजारपेठ पोलिस ठाण्यात सुरू होते. संशयित आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांचे संयुक्त पथक रवाना झाले आहे. सोमवारी संस्था उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
संस्थेचे ऑडिटर व संबंधित एरिया मॅनेजर यांनी सोमवार, मंगळवार असे दोन दिवस संस्थेतील सोन्याची तपासणी केली. ऑडिटनंतर बँकेत ठेवलेल्या १,२६० पाकिटापैकी १६ ते १७ पाकीट लंपास झाल्याचे लक्षात आले. सोने लंपास करण्याअगोदर आरोपीने बँकेतील सर्व सीसीटीव्हीचे कॅमेरे बंद केले होते असे निदर्शनास आले आहे.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठून मंगळवारी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.