अफगाणिस्थान येथून तस्करी केलेले १०० किलो अमली पदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 09:10 PM2019-07-26T21:10:09+5:302019-07-26T21:14:51+5:30
हि कारवाई संपूर्ण दिल्ली पोलिसांच्यामार्फत करण्यात आली होती.
पनवेल - अफगाणिस्थान येथून जेएनपीटी येथे तस्करी केलेले सुमारे १०० किलो (हिरोईन) अमली पदार्थ दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने पनवेल येथून २६ जुलै रोजी जप्त केले. याप्रकरणी दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला घेऊन दिल्ली पोलीस जेएनपीटी याठिकाणी दाखल झाली होती. अफगाणिस्थान येथून जेएनपीटी येथे हा अमली पदार्थाने भरलेला हा कंटेनर उतरविण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी यावेळी जेएनपीटी कस्टम अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या सहाय्याने या कंटेनरची माहिती मिळविली. दरम्यान, हा कंटेनर पनवेलमधील एका गोदामात ठेवण्यात आला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मिळाल्यानंतर त्यांना याठिकाणी छापा टाकून हे अमली पदार्थ जप्त केले. हि कारवाई संपूर्ण दिल्ली पोलिसांच्यामार्फत करण्यात आली होती. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे देखील यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते.