ऑनलाईन गंडा... एप इन्स्टॉल करायला लावत २ लाख ४५ हजारांची फसवणूक
By नितीश गोवंडे | Published: April 6, 2023 07:32 PM2023-04-06T19:32:32+5:302023-04-06T19:37:49+5:30
विठ्ठल धर्मु परामणे (५८, रा. कात्रज कोंढवा रोड) यांनी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून त्यांच्याच कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डवर १६ हजार ८३६ रुपये पाठवले होते
नितीश गोवंडे
पुणे : दिवसेंदिवस ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत. विविध मार्गांचा अवलंब करत लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामध्ये ज्येष्ठ व्यक्तींना फसवण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यातुलनेत फसवणुक झाल्यानंतर त्याची परतफेड पोलिसांकडून केली जाण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. अशाच पद्धतीने अेनिडेस्क अॅप इन्स्टॉल करायला लावून एका इसमाची २ लाख ४५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल धर्मु परामणे (५८, रा. कात्रज कोंढवा रोड) यांनी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून त्यांच्याच कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डवर १६ हजार ८३६ रुपये पाठवले होते. पण ते पैसे जमा न झाल्याने त्यांनी गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर (७९९७७१४०५७) शोधून त्यावर फोन केला. फोनद्वारे त्यांनी ट्रान्झेक्शन पूर्ण न झाल्याचे तसेच डेबिट झालेले पैसे पुन्हा क्रेडिट न झाल्याचे सांगितले. यावेळी फोनवर बोलण्यात गुंतवून समोरच्या व्यक्तीने त्यांना अेनिडेस्क अॅप इन्स्टॉल करायला लावले. त्यानंतर परामणे यांच्या कोटक बँकेतून ९० हजार आणि एचडीएफसी बँकेतून १ लाख ५४ हजार ५०० रुपये असे एकूण २ लाख ४५ हजार रुपये परस्पर काढून घेत त्यांची फसवणूक केली. यानंतर परामणे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ आणि सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी आलेल्या आर्जाची चौकशी करून याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास सांगितल्यावर ५ एप्रिल रोजी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पुराणिक करत आहेत.