मोहोळ हत्याकटात २ वकीलही, ८ आरोपींना अटक; सीसीटीव्हीमध्ये गोळ्या झाडतानाचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 06:01 AM2024-01-07T06:01:03+5:302024-01-07T06:01:22+5:30
दहा वर्षांपूर्वी झालेल्या मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी केली हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: गँगस्टर शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करणारा साहिल पोळेकरसह त्याला मदत करणाऱ्या आठजणांना अटक करण्यात आली. दहा वर्षांपूर्वी झालेल्या मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी साहिलने मामासह कट रचून मोहोळचा गेम केल्याचे उघड झाले असून, या कटात दोन वकिलांचाही हात असल्याचे पुढे आले आहे.
साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल किसन गांदले, अमित मारुती कानगुडे, नामदेव महिपत कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, ॲड. रवींद्र वसंतराव पवार आणि ॲड. संजय रामभाऊ उडान यांना अटक झाली. वकिलांना ८ व बाकी आरोपींना १० जाने.पर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
आरोपी पळत होते कोल्हापूरकडे
घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखा अलर्ट झाली. आरोपी एका स्विफ्ट गाडीतून कोल्हापूरच्या दिशेने जात असल्याचे समजताच पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. आठ आरोपींकडून ३ पिस्टल, ३ मॅगझिन, ५ जिवंत काडतुसे, ८ मोबाइल आणि गाडी असा २२ लाख ३९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
दबा धरून बसले होते...
नामदेव कानगुडे व त्याचा भाचा मुन्ना कोळेकर याच्याशी शरदचा वाद झाला. तेव्हापासून मोहोळचा काटा काढण्याची संधी तो शोधत होता. शुक्रवारी शरदच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने तो दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाण्यासाठी दुपारी दीडच्या सुमारास त्याच्या कार्यालयातून खाली आला. साहिल खाली उभा होता. त्याने व २ साथीदारांनी शरदवर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी मोहोळचा रुग्णालयात मृत्यू झाला.
मामा-भाचे सूत्रधार
मोहोळ खून प्रकरणात मुन्ना पोळेकर आणि नामदेव ऊर्फ मामा कानगुडे हे मुख्य सूत्रधार आहेत. कानगुडे हा पोळेकर याचा मामा लागतो. पोळेकरशी जमीन खरेदी व्यवहारातून मोहोळचे वाद झाले होते. कानगुडे याच्याशीही मोहोळचे वाद झाले होते. तेव्हापासून मोहोळचा काटा काढण्यासाठी काही महिन्यांपासून ते तयारी करत होते. त्यासाठी त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पिस्तूल खरेदी केली होती.