रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह, दोन मुली बाहुलीशी खेळत होत्या…; ह्दय पिळवटून टाकणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 03:57 PM2021-07-23T15:57:04+5:302021-07-23T15:59:01+5:30
पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी खिडकीतून पाहिले असता सगळेच हैराण झाले
चेन्नई – ही घटना कुठल्याही सिनेमाचं कथानक नाही तर प्रत्यक्ष वास्तविक जीवनात घडलेली आहे. या घटनेने अनेकांचे ह्दय पिळवटून निघेल. तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात राहणाऱ्या दोन बहिणी ज्या मानसिक रुग्ण आहेत. स्वत:च्या आईच्या मृतदेहाशेजारी बाहुलीसोबत खेळताना दिसून आल्या. या दोघींनी आईची हत्या केल्याचं उघड झालं आहे. मृत महिलेचं नाव उषा आहे.
उषा ही तिच्या दोन मुलींसह पलयमकोट्टई येथील केटीसी नगरमध्ये राहायची. महिला आणि तिचा पती यांच्यात तलाक झालेला आहे. शाळेतील मुलांना शिकवणी देण्याचं काम उषा करत होती. मंगळवारी सकाळी उषा घरातून बाहेर न पडल्यानं शेजाऱ्यांना काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला. घराच्या खिडक्या बंद होत्या. तेवढ्यात एक मुलगी घराबाहेर आली आणि तिची आई गेली असं म्हणाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी खिडकीतून पाहिले असता सगळेच हैराण झाले. उषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडला होता. मुली तिच्या बाजूला बसून बाहुलीसोबत खेळत होत्या. अनेक अडचणीनंतर पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला. उषाच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या मुलींचे कपडेही रक्ताने माखले होते. त्यानंतर पोलिसांनी उषाचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला.
उषाच्या मृत्यूचा कोणताही धक्का तिच्या मुलींना बसला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी ही गोष्ट संशयास्पद वाटली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एक बहीण दुसऱ्या बहिणीला बिस्किट खायला देत होती. या दोन्ही मुलींना सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं आहे. त्यानंतर पोलीस चौकशीत एकीने कबूल केले की, आईच्या डोक्यावर दांडक्याने मारलं आणि त्यानंतर चाकूने भोसकून तिची हत्या केली. या दोन्ही बहिणी मानसिक रुग्ण असल्याने सध्या त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काही मनोवैज्ञानिक आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पोलीस या दोन्ही मुलींचा जबाब नोंदवणार आहे. मुलींनी ही हत्या का केली? याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. आईच्या निर्दयी हत्येने अनेकांना धक्का बसला आहे.