पोलिस असल्याचे धमकावून खंडणी उकळणाऱ्याला २ जणांना अटक
By धीरज परब | Published: January 28, 2023 08:03 PM2023-01-28T20:03:31+5:302023-01-28T20:04:24+5:30
दीपक हॉस्पिटल लगतच्या मार्गावर श्री राज एन्क्लेव या इमारतीतल्या एका घरात पोलीस असल्याचे सांगत दोघेजण घुसले .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड :- पोलीस असल्याचे धमकावून ४० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन भामट्याना भाईंदर पूर्व भागातून नवघर पोलिसांनी अटक केली आहे.
दीपक हॉस्पिटल लगतच्या मार्गावर श्री राज एन्क्लेव या इमारतीतल्या एका घरात पोलीस असल्याचे सांगत दोघेजण घुसले . त्यावेळी घरत राहणारी तरुणी भाविका, तिची आई तुलसी पुरोहित व परिचित यांच्या कडे चौकशी करू लागले. तुम्ही घरात वेश्या व्यवसाय चालवत आहात, खाली पोलिसांची गाडी उभी असून त्यात महिला पोलीस असल्याचे सांगत त्यांना गुन्हा दाखल करण्याची व सोसायटी मध्ये बदनामी करण्याची धमकी देत ५ लाखांची मागणी दोघांनी केली .
पोलीस असल्याने घाबरून तरुणीने तिचे दागिने सराफा कडे गहाण ठेऊन ४० हजार रुपये दिले . त्या दरम्यान तिने बहिणीला कॉल करून पोलिस ठाण्यात कळवण्यास सांगितले . नवघर पोलिसांनी पुरोहित यांच्या घरी जाऊन तेथे असलेल्या एका तोतया पोलिसाला अटक केली . तर पैसे घेऊन भाविका सोबत परत असलेल्या तोतयास सुद्धा पोलिसांनी पकडले . सुदर्शन खंदारे व जितेंद्र पटेल असे अटक केलेल्या खंडणीखोर तोतया पोलिसांची नावे आहेत.