संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी २ जण ताब्यात, सीसीटीव्हीत दिसले हल्लेखोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 09:32 AM2023-03-04T09:32:48+5:302023-03-04T09:35:02+5:30
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोधा घेतला
मुंबई : मॉर्निंग वॉक करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मास्क लावून आलेल्या तिघांनी स्टम्प व बॅटने हल्ला केल्याची घटना शिवाजी पार्क येथे शुक्रवारी घडली. शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी आठ पथके तैनात करण्यात आली असून पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले आहे. पोलिसांनी सध्या २ जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोधा घेतला. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दोघेही भांडुप मधील असल्याची माहिती समोर येत असून, त्यात एका शिवसैनिकाचाही समावेश आहे. पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला. त्यामध्ये, आरोपी सदर ठिकाणाहून पलायन करत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर, दोघांना ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे.
देशपांडे हे नियमितपणे शिवाजी पार्क येथे मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला येतात. वॉक झाल्यानंतर सगळे एकत्रित नाक्यावर भेटतात. शुक्रवारी सकाळी देशपांडे नेहमीप्रमाणे वॉक करत असताना मास्क लावून आलेल्या त्रिकुटाने त्यांच्यावर हल्ला केला. स्टम्प आणि बॅटने त्यांना मारहाण करत हल्लेखोर पळून गेले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
हल्लेखोर म्हणाले, ठाकरेंना नडतोस का?
संदीप देशपांडे यांनी जबाबात म्हटले आहे की, सकाळी नेहमीप्रमाणे ६.५० च्या सुमारास माहीम येथील घरातून मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्क मैदानाकडे निघालो. मैदानाचे गेट क्रमांक ५ येथे सातच्या सुमारास पोहोचलो.
मात्र, अन्य मित्र आले नव्हते. म्हणून एकट्यानेच वॉक सुरू केले. मैदानाचा एक राऊंड पूर्ण करून सी. रामचंद्र चौकाकडून मैदानाच्या गेट ५ कडून पुढे येताच, कुणीतरी मागून उजव्या पायाच्या मांडीवर फटका मारला म्हणून मागे वळून पाहताच चार तरुण दिसले. त्यांच्या हातात लाकडी स्टंप व बॅट होते.
शिव्या घालून पत्र लिहितोस का? ठाकरेंना नडतोस का? वरुणला नडतोस का?, असे विचारत मारहाण केली. स्थानिकांनी मध्यस्थी केली. त्यांनाही ओरडून धमकाविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची पळापळ झाली.