मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 04:58 PM2020-07-31T16:58:40+5:302020-07-31T18:07:00+5:30
नोटीस आली म्हणून थांबणार नाही तर लोकांना न्याय देण्याचं काम करणारच असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
ठाणे – मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. अलीकडेच वसई-विरार महापालिकेत त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आज ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना पोलिसांनी त्यांना तडीपारीची नोटीस बजावली आहे.
याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, मागची अनेक वर्ष लोकांसाठी आंदोलन करतोय, स्वत:साठी आंदोलन केले नाही, आजही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मुलांसाठी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना त्यांना ही नोटीस प्राप्त झाली आहे. या नोटिशीमध्ये मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातून हद्दपार होण्यासं सांगितलं आहे. जिल्ह्यात इतके गुंड आहेत त्यांना अशी नोटीस कधी बजावली नाही, लोकांसाठी आंदोलन करताना अशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच माझ्या सुरुवातीच्या सभेत मी म्हटलं होतं मला पोलीस तडीपारीची नोटीस बजावतील, आज ती नोटीस मला मिळाली. लोकांसाठी भांडायचं नाही का? लोकांसाठी आंदोलन करताना तडीपारीची नोटीस हे महाराष्ट्र सरकारचं बक्षीस आहे, कोकणासाठी मोफत बस सोडणार म्हणून हे बक्षीस आहे, लोकांचे, पोलिसांच्या समस्या प्रखरतेने मांडले त्याचं हे बक्षीस आहे. त्यामुळे यापुढे लोकांसाठी कोणी रस्त्यावर उतरायचं की नाही हे लोकांनी ठरवावं. नोटीस आली म्हणून थांबणार नाही तर लोकांना न्याय देण्याचं काम करणारच असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
ही नोटीस बजावल्यानंतर पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेकडून ठाणे महापालिकेसमोर आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. येत्या ४ ऑगस्टपर्यंत विरारच्या उपविभागीय अधिकारी रेणुका बागडे यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची मुदत अविनाश जाधव यांना देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिका हद्दीत खासगी लॅबने रुग्णाला चुकीचा रिपोर्ट दिल्यानंतरही अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं होतं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
“उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसले पण कारभार दिसला नाही; हे सरकार पडावं अशी इच्छा नाही, पण...”
..म्हणून मी घराबाहेर जाणं टाळतो; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला खुलासा
मनसे-शिवसेनेत वाद पेटणार? शुभ बोल रे नाऱ्या...! राज ठाकरेंवर शिवसेनेची बोचरी टीका
‘या’ पाकिस्तानी गुंतवणूकदारासोबत बॉलिवूड कलाकारांचे कनेक्शन; दहशतवाद्यांना फंडिंग करण्याचा आरोप
राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन उद्धव ठाकरेंना टोला; राज ठाकरेंनी मांडली परखड भूमिका