२० जणांची जम्मू काश्मीरमधून आग्रा जेलमध्ये रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 10:09 PM2019-08-09T22:09:20+5:302019-08-09T22:10:58+5:30
२० जणांना विमानाने उत्तर प्रदेशमध्ये घेऊन आल्यानंतर आग्रा सेंट्रल जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी जम्मू काश्मीरच्या तुरुंगात असलेल्या ५० हून अधिक कैद्यांना हवाई दलाच्या विमानामधून आग्रा येथील तुरुंगात हलविण्यात आले होते. जम्मूमध्ये परिस्थिती बिघडल्यास तेथील तुरुंग अपुरे पडू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर आज जम्मू काश्मीरमध्ये समाज विघातक घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून २० जणांना विमानाने उत्तर प्रदेशमध्ये घेऊन आल्यानंतर आग्रा सेंट्रल जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे. यात काही काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावाद्यांचा समावेश आहे.काश्मीर हायकोर्ट बार असोशिएशनचे अध्यक्ष मिलन कयूम यांना देखील आग्रा तुरुंगात पाठविण्यात आले आहे. बऱ्याच फुटीरवाद्यांचं वकीलपत्र यांनी हाती घेतले होते. तसेच अनेक गुन्हे देखील त्यांच्याविरोधात दाखल आहेत.