शेलपिंपळगावमध्ये २० कोटींचे अमली पदार्थ जप्त; ५ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 10:42 AM2020-10-08T10:42:12+5:302020-10-08T10:44:10+5:30
Pune Crime News : अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी काही जण शेलपिंपळगाव येथे येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.
शेलपिंपळगाव - शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे विक्रीसाठी आणलेले २० कोटी रुपयांचे अमली पदार्थ (मेफेड्रॉन, एमडी) पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले. अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि.७) दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई केली असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
चेतन फक्कड दंडवते (वय २८, रा. मलठण - आंबेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय २५, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय २५, रा. पाचर्णे मळा, ता.शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (वय ४४, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय ३१, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी काही जण शेलपिंपळगाव येथे येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी एकच्या सुमारास दशमेज ढाब्याजवळ पोलिसांनी सापळा लावून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून २० कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची कार रोख २३ हजार १०० असा एकूण २० कोटी पाच लाख २३ हजार १०० रुपयांचा ऐवज पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांनी बुधवारी (दि. ७) याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.