शूज, पर्समधून २० कोटीच्या कोकेनची तस्करी; दोन परदेशी महिला तस्करांना बेड्या
By मनीषा म्हात्रे | Published: November 21, 2022 10:07 PM2022-11-21T22:07:37+5:302022-11-21T22:08:55+5:30
एनसीबीची कारवाई, दोन जोडी बूट आणि पर्समधील पोकळीमध्ये अशी एकूण ८ कोकेनची पाकिटे लपवून ठेवण्यात आली होती
मुंबई - शूज, पर्समधून २० कोटी किंमतीच्या २.८०० किलो कोकेनच्या तस्करीचा डाव एनसीबीने उधळून लावला आहे. याप्रकरणी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटच्या दोन परदेशी महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. एनसीबी मुंबईने या कारवाईत मरिंडा एस. आणि एच. मुसा नावाच्या दोन परदेशी महिला तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.
एनसीबी मुंबईचे प्रमुख अमित घावटे यांच्या मार्गदशर्नाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सिंडिकेटद्वारे मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होणार असल्याची माहिती मिळताच तपास सुरु केला. या ड्रग्ज रॅकेटमध्ये मरिंडा एस नावाच्या दक्षिण आफ्रिकन महिलेबाबत माहिती एनसीबीला मिळाली. याच माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचून रविवारी इथियोपिया येथून मुंबईत आलेल्या मरिंडा एस. हिला ताब्यात घेतले. या महिलेकडील सामानामध्ये एनसीबीला २.८०० किलो वजनाचे उच्च दर्जाचे कोकेन सापडले. दोन जोडी बूट आणि पर्समधील पोकळीमध्ये अशी एकूण ८ कोकेनची पाकिटे लपवून ठेवण्यात आली होती. मरिंडा एस हिला ताब्यात घेऊन एनसीबीने तिच्याकडे कसून चाैकशी केली असता तिने अंधेरीतील एका हाॅटेलमध्ये एका व्यक्तीला हे ड्रग्ज पोच करायचे असल्याचे सांगितले.
त्यानुसार, एनसीबीच्या दुसऱ्या पथकाने अंधेरीतील हाॅटेलमध्ये सापळा रचून एच. मुसा या नायजेरियन महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत ती मरिंडाकडून माल घेण्यासाठी आली असल्याचे सांगितले. तेथून हा माल मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणी वितरित करण्यात येणार असल्याचे सांगितले. ती मुंबईत कुणाला हा माल देणार होती? यासह यामागील मुख्य सूत्रधाराबाबत पथकाकडून अधिक तपास सुरु आहे.
...
दक्षिण अमेरिका ते मुंबई ...
दक्षिण अमेरीकेतून हे कोकेन मुंबईत तस्करीसाठी आणण्यात आले होते. दोन्ही महिलांकडे त्यांचे स्थानिक ग्राहक आणि विदेशात असलेले पुरवठादार यांच्याबाबत चाैकशी सुरु असल्याचे एनसीबीने सांगितले. तसेच, त्यांच्याकडील मोबाईलही पथकाने ताब्यात घेत अधिक तपास सुरु आहे.