बाभूळगावच्या व्यापाऱ्याची २० लाखांची बॅग लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 12:37 PM2021-02-11T12:37:26+5:302021-02-11T12:38:30+5:30
crime News : बाभूळगाव येथील एका सराफा व्यापाऱ्याची २० लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
यवतमाळ : बाभूळगाव येथील एका सराफा व्यापाऱ्याची २० लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
बाभूळगाव येथील सराफा व्यापारी सुरेश पारसमल वर्मा गुरुवारी नेहमीप्रमाणे बॅग घेऊन आपल्या घरुन शिवाजी चौक स्थित दुकानात आले. दुकानाचे कुलूप उघडत असताना कुलूपला घाण लागून असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळील बॅग तेथेच ठेवली. क्षणार्धात चोरट्यांनी ही बॅग लंपास केली. या बॅगमध्ये तब्बल रोख आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण २० लाखांचा मुद्देमाल असल्याचे सांगितले जाते. याबाबत त्वरित पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीचा शोध सुरू केला.
दरम्यान, पाच-सहा वर्षांपूर्वीही सराफा व्यावसायिक सुरेश वर्मा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी ते नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून बॅगमध्ये दागिने टाकून घरी पोहोचले होते. ऐन घराजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. मात्र शेजारी धावून आल्याने हल्लेखोर अंधाराचा लाभ घेत पळून गेले होते. त्यानंतर वर्मा यांनी दुकानातच तिजोरी तयार करून त्यातच दागिने ठेवण्यास सुरुवात केली होती. आता जवळपास पाच-सहा वर्षानंतर पुन्हा त्यांची बॅग चोरीला गेली. या घटनेने बाभूळगावच्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.