जमिनीच्या व्यवहारात २० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 04:31 AM2019-02-04T04:31:02+5:302019-02-04T04:31:15+5:30
अकोले येथील १.१८ हेक्टर जमीन चंद्रकांत लामखडे यांनी ५१ लाख ५१ हजारांमध्ये विकल्यानंतर त्यातील २० लाख एक हजार रुपये घेऊनही व्यवहार पूर्ण केला नाही.
ठाणे : अकोले येथील १.१८ हेक्टर जमीन चंद्रकांत लामखडे यांनी ५१ लाख ५१ हजारांमध्ये विकल्यानंतर त्यातील २० लाख एक हजार रुपये घेऊनही व्यवहार पूर्ण केला नाही. सुरेश मोरे (४६, रा. वर्तकनगर) यांचे पैसेही परत न करणाऱ्या लामखडे यांच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोरे यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील वडझोरे येथील असून त्यांची तिथे वडिलोपार्जित मालमत्ताही आहे. किसन गोपाळे, निवृत्ती जाधव या ठाण्यातील मित्रांसह ते गावी जमीनखरेदी करण्यासाठी शोध घेत होते. त्यानुसार, एका इस्टेट एजंटमार्फत चंद्रकांत लामखडे (मु. जाचकवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेव्हा लामखडे यांनी त्यांची १.१८ हेक्टर जमीन, पक्के घर आणि गोठ्यासह विक्री करावयाची असल्याचे सांगितले. २० फेब्रुवारी २०१७ रोजी लामखडे हे मुलगा नितीन आणि मित्र अमोल बोडखे यांच्यासमवेत ठाण्यात आले होते. त्यावेळी गोपाळे, जाधव आणि संध्या खिल्लारी या तीन भागीदारांसह मोरे यांनी ही जमीन ५० लाख ५१ हजारांमध्ये विकत घेतली. सुरुवातीला २३ फेब्रुवारी २०१७ मध्ये ५१ हजारांची आणि २० मार्च २०१७ मध्ये ५० हजारांची अशी एक लाख एक हजारांची रक्कम मोरे यांनी दिली. त्यानंतर जाधव, गोपाळे आणि खिलारे यांनी साडेसहा लाखांची रक्कम दिली. जून २०१७ पर्यंत या चौघांनी त्यांना २० लाख एक हजारांची रक्कम धनादेश आणि रोख स्वरूपात दिली. पुढे वेगवेगळी कारणे देत लामखडे यांनी जमिनीचा व्यवहार करण्यास नकार दिला. वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी हे पैसेही मोरे यांच्यासह चौघांना परत केले नाही. अखेर, त्यांनी आधी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. त्याच्या चौकशीतून याप्रकरणी मोरे यांनी याप्रकरणी १ फेब्रुवारीला २० लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सी.एन. यादव तपास करत आहेत.