कल्याण डोंबिवलीमध्ये 20 जणांवर मोक्का; 1680 रिक्षा चालकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 03:17 PM2018-10-17T15:17:52+5:302018-10-17T15:49:48+5:30
36 जणांवरील ही कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कल्याण - कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी विविध गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. त्यानुसार कल्याण डोंबिवलीतील 4 टोळ्यांच्या 20 जणांवर मोक्कानव्ये कारवाई केली. तर 21 जणांना तडीपार करण्यात आले असून आणखी 36 जणांवरील ही कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे (कल्याण), रविंद्र वाडेकर (डोंबिवली) हे देखील उपस्थित होते.
रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीला आळा घालण्यासाठी कायदेभंग करणाऱ्या 1हजार 680 हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच रिक्षाचालकांना शिस्त लागावी यासाठी रिक्षा संघटनांच्या 150 पदाधिकाऱ्यांना नोटीसाही पाठवण्यात आल्या आहेत. तर कारवाई करूनही रिक्षा चालकांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्यांचे बॅच, परमिट, लायसन्स रद्द करण्यासह वेळप्रसंगी रिक्षाजप्तीची कारवाईही करण्याचा इशाराही प्रताप दिघावकर यांनी यावेळी दिला.