तलाठ्याने घेतली २० हजारांची लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 06:47 PM2018-10-30T18:47:33+5:302018-10-30T18:48:00+5:30
- रेतीच्या वाहतुकीदरम्यान रेतीघाट कंत्राटदारावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना आरमोरी तालुक्यातील देऊळगावचा तलाठी मोतीलाल लहुजी राऊत (५४) याला रंगेहात पकडण्यात आले.
गडचिरोली - रेतीच्या वाहतुकीदरम्यान रेतीघाट कंत्राटदारावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना आरमोरी तालुक्यातील देऊळगावचा तलाठी मोतीलाल लहुजी राऊत (५४) याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गडचिरोलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि.३०) केली.
एसीबीकडून प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारकर्ता हे रेती कंत्राटदार आहे. रेती घाट घेणाºया मुख्य कंत्राटदाराशी करारनामा करून ते आपल्या दोन सहकारी कंत्राटदारांसह नदीतील रेती काढून वाहतूक करीत असतात.
सप्टेंबर महिन्यात सदर कंत्राटदारावर त्यांच्या रेती घाटावरून निघालेल्या रेतीच्या ट्रकवर कारवाई न करता सोडून देण्याचा मोबदला म्हणून देऊळगाव साजा क्र.१९ चे तलाठी मोतीलाल राऊत यांनी एक लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ८० हजार देण्याचे ठरले. याशिवाय रेती वाहतूक करताना तीन महिन्यात कोणतीही कारवाई न करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी राऊत याने केली.
दरम्यान रेती कंत्राटदाराने एसीबीकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मंगळवार दि.३० रोजी एकूण लाचेपैकी पहिला हप्ता २० हजार रुपये घेताना तलाठी राऊत याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, नायक सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, तसेच देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, महेश कुकुडवार, तळशीदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार, सोनल आत्राम, सोनी तवाडे आदी कर्मचाºयांनी केली.