बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 12:03 IST2021-09-01T12:03:48+5:302021-09-01T12:03:56+5:30
20 years imprisonment for abusing a girl : बुलडाणा विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने साेमवारी आरोपीस २० वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे जन्मठेपेची शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मक्याच्या शेतात नेऊन एका आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बुलडाणा विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने साेमवारी आरोपीस २० वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
चिखली तालुक्यात ७ मार्च २०२० रोजी ही घटना घडली होती. गजानन ज्ञानबा मोरे (५०) असे आरोपीचे नाव आहे. एका गावातील काही महिला आणि आरोपी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये टोमॅटो तोडण्यासाठी गेले होते. यामध्ये पीडित मुलीचाही समावेश होता. पीडित आठ वर्षीय बालिका शेतातील कोठ्याजवळ खेळत होती. आरोपीने पीडित बालिकेस मक्याच्या शेतात पाइप उचलण्यासाठी चल, असे म्हणून दुसरीकडे शेतात घेऊन गेला. तिथे कोणीही नसताना आरोपीने बालिकेवर बलात्कार केला.
बालिकेने विरोध केला असता आरोपीने तिला ही बाब कोणालाही सांगू नको असे म्हणत घरी गेल्यावर २० रुपये देण्याचे आमिष दिले. संध्याकाळी जेव्हा पीडित बालिकेस त्रास होऊ लागला तेव्हा तिने संपूर्ण घटना तिच्या आईवडिलांना सांगितली़ या प्रकाराची तक्रार पीडितेच्या आईने अमडापूर पोलीस ठाण्यात दिली़ पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक करून त्याच्या विरोधात बलात्कार व पोस्काे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ न्यायालयाने या प्रकरणात वादी-प्रतिवादी पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपी गजानन मोरे यास बलात्कार आणि पोस्को कायद्याच्या कलमांतर्गत दोषी ठरवले. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी आरोपी गजानन मोरे यास ३० ऑगस्ट राेजी २० वर्षे कठोर कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीस एक महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
समाजातील अशा विकृत मानसिकता ठेवणाऱ्यांवर कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे, त्या दृष्टीने वादी पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद सुनावणीदरम्यान करण्याचा प्रयत्न केला. पीडितेला न्याय मिळवून दिल्याचे समाधान आहे.
- ॲड. आशिष केसाळे,
जिल्हा सरकारी वकील, बुलडाणा