२०० विद्यार्थ्यांना फेक युनिव्हर्सिटीचा फटका; चार वर्षांपासून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:59 AM2019-06-06T01:59:47+5:302019-06-06T01:59:57+5:30

काही विद्यार्थ्यांनी या विद्यापीठाबाबत माहिती घेण्यासाठी थेट राजस्थान गाठले; पण तिथे त्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी यासंबंधी पोलिसात तक्रार केली

200 students hit Fek University; Four years of fraud | २०० विद्यार्थ्यांना फेक युनिव्हर्सिटीचा फटका; चार वर्षांपासून फसवणूक

२०० विद्यार्थ्यांना फेक युनिव्हर्सिटीचा फटका; चार वर्षांपासून फसवणूक

googlenewsNext

मुंबई : ठाण्यातील एनईटी प्यारामेडिकल कॉलेज आणि कॉलेजची युनिव्हर्सिटी फेक असल्याचे समोर आले आहे. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २०० विद्यार्थ्यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. या कॉलेजमध्ये फेक डिग्री सर्रासपणे दिली जात असल्याची तक्रार खुद्द विद्यार्थी करीत आहेत. ठाण्यातील एनईटी प्यारामेडिकल कॉलेज हे राजस्थानच्या चुरू विद्यापीठाच्या अंतर्गत चालविले जात असून या विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्णय महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिऐशन - ‘मसला’कडून घेण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून हे प्रकरण समोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले.

मागील ४ वर्षांपासून या कॉलेजमध्ये फार्मसीचे कोर्स घेतले जात आहेत. पण हे कोर्स घेण्यासाठी यूजीसीची कोणतीही परवानगी या विद्यापीठाला नाही. त्यामुळे हे कॉलेज गेल्या ४ वर्षांपासून विद्यार्थ्यांची फसवणूक करून पैसे उकळत असल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत. एका विद्यार्थ्याकडून दीड ते दोन लाख रुपये फी या कॉलेजने घेतली आहे. गंभीर बाब म्हणजे कॉलेजने विद्यार्थ्यांची फी ही डीडीच्या स्वरूपात अथवा चेकने न घेता कॅशच्या स्वरूपात घेतली असल्याची माहिती महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिऐशन - ‘मसला’कडून देण्यात आली.

काही विद्यार्थ्यांनी या विद्यापीठाबाबत माहिती घेण्यासाठी थेट राजस्थान गाठले; पण तिथे त्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी यासंबंधी पोलिसात तक्रार केली; पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे विद्यार्थी गुरुवारी ठाण्यात आंदोलन करणार आहेत. कॉलेजचे प्राचार्य टी. रामाणी यांच्याविरुद्ध हे आंदोलन करण्यात येणार आहे. आमचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी कॉलेजचे प्राचार्य टी. रामाणी आणि विद्यापीठाचे जोगिंदर सिंह यांना तत्काळ अटक करावी, विद्यार्थ्यांची घेतलेली फी आणि डोनेशन परत करावे, नुकसानभरपाई म्हणून प्रत्येक महिन्याला ३० हजार प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात यावेत आणि या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशा मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ताहीलरामाणी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.

Web Title: 200 students hit Fek University; Four years of fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.