२ हजाराच्या लाचप्रकरणी तलाठ्यास पाेलिस काेठडी
By राजकुमार जोंधळे | Published: August 5, 2023 07:41 AM2023-08-05T07:41:26+5:302023-08-05T07:41:45+5:30
लातुरातील एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल
राजकुमार जाेंधळे, लातूर: प्रकल्पगस्त प्रमाणपत्र तक्रारदाराच्या नावाने करून देण्याच्या कामासाठी माेबदला म्हणून, दाेन हजारांची लाच घेणाऱ्या एका तलाठ्याला एसीबीच्या पथकाने गुरुवारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात रंगेहाथ पकडले. याप्रकरणात त्याला लातूरच्या न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे.
एसीबीच्या सुत्रांनी सांगितले, तलाठी केरबा गाेविंदराव शिंदे (वय ४८, रा. प्रकाशनगर, लातूर) हा जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागात कार्यरत असून, तक्रारदाराच्या चुलत बहिणीच्या नावावर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे. ते आजीच्या शपथपत्राच्या आधारे तक्रारदाराच्या नवाने करून देण्याच्या कामासाठी तलाठी शिंदे याने प्रारंभी पाच हजारांची लाच मागितली. अखेर तडजाेडीअंती दाेन हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपतच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सापळा लावला. यावेळी दाेन हजारांची लाच घेताना त्यास रंगेहाथ पकडले.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शुक्रवारी लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे. अशी माहिती लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिली.