कोणार्क एक्स्प्रेसमध्ये मिळाला २१ किलो गांजा, कल्याण आरपीएफने केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 05:47 PM2021-09-18T17:47:11+5:302021-09-18T17:47:49+5:30
Crime News: कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या कोणार्क एक्सप्रेसच्या डी२ बोगीतील एका सीट खाली सापडलेल्या बेवारस बॅगेतून २ लाख ७ हजार रुपये किमतीचा २१ किलो अमली पदार्थ कल्याण आरपीएफने जप्त केला आहे.
डोंबिवली - कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या कोणार्क एक्सप्रेसच्या डी२ बोगीतील एका सीट खाली सापडलेल्या बेवारस बॅगेतून २ लाख ७ हजार रुपये किमतीचा २१ किलो अमली पदार्थ कल्याण आरपीएफने जप्त केला आहे. हे अमली पदार्थ (गांजा) नारकोटिक्स विभागाला सुपूर्द करण्यात आला असून हा गांजा कोणी आणि कुठून आणला आहे, याचा तपास सुरू आहे. शुक्रवारी पहाटे २ वाजून ३० मिनिटाच्या वाजण्याच्या सुमारास उडीसाहून कल्याण स्थानकात येत असलेल्या कोणार्क एक्सप्रेसच्या डी२ बोगीतील एका सीट खाली बेवारस बॅग असल्याची माहिती प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी आरपीएफ ला सूचना देण्यात आल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कल्याण आरपीएफचे पोलीस ठाण्याचे प्रभारी भुपेंद्र सिंह आणि त्यांच्या पथकाने कोणार्क एक्सप्रेस रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकातील ७ नंबर फलाटावर दाखल होताच आरपीएफने सुरक्षेच्या कारणास्तव एक्स्प्रेसची संपूर्ण बोगी रिकामी करत तपासणी केली असता सीट खाली लाल रंगाची ट्रॉली बॅग आणि काळ्या रंगाची सॅग बॅग आढळून आली. आरपीएफ टीमने त्या संशयित बॅगेची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात हिरव्या रंगाचे गवतासारखे दिसणारा २० किलो ७८० ग्राम वजनाचा अमली पदार्थ ( गांजा) असल्याचे आढळून आले. हा गांजा नारकोटिक्स विभागाला सुपूर्द करण्यात आला असून तो कोणी आणि कुठून आणला आहे याचा तपास सुरू असल्याचे शुक्रवारी माध्यमांना सांगण्यात आले.