२१ लाखांच्या फसवणूक प्रकरणी बिल्डरवर गुन्हा, डिसेंबर १७ ते ऑगस्ट २२ दरम्यान व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 06:04 AM2022-08-17T06:04:27+5:302022-08-17T06:04:55+5:30
योगेश रामचंद्र कळमकर असे त्याचे नाव असून १२ डिसेंबर २०१७ ते १५ ऑगस्ट २०२२ या दरम्यान त्याने व्यवहार केला होता.
महाड : एका ग्राहकाला सदनिका देण्याच्या नावाखाली २१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील एका बांधकाम व्यावसायिकावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश रामचंद्र कळमकर असे त्याचे नाव असून १२ डिसेंबर २०१७ ते १५ ऑगस्ट २०२२ या दरम्यान त्याने व्यवहार केला होता.
कळमकर यांनी साईयोग या इमारतीमध्ये ६५० चौरस फुटांची सदनिका सुभाष गौरू पाटील यांना विकत दिली होती. त्याची किंमत २३ लाख रुपये आहे. परंतु या बिल्डरने ग्राहकाकडून २१ लाख रुपये घेऊन शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर साठेकरार करून दिलेला होता.
असे असतानाही कळमकर यांनी तो फ्लॅट परस्पर मीतेश चोपडा या अन्य ग्राहकाला विकला.
ही बाब लक्षात येताच पाटील यांनी कळमकर यांना फ्लॅट किंवा पैसे परत मिळावेत, यासाठी मागणी केली. मात्र तो टाळाटाळ करीत असल्याने पाटील यांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे हे करीत आहेत.