नागपुरात औषध व्यापाऱ्यास लावला २२ लाखाचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:20 PM2020-02-25T23:20:55+5:302020-02-25T23:22:40+5:30
दोन कोटी रुपयांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका औषध व्यापाऱ्यास २२.५० लाखाचा चुना लावण्यात आला. रुपये मिळताच ठगबाज आरोपी फरार झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन कोटी रुपयांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका औषध व्यापाऱ्यास २२.५० लाखाचा चुना लावण्यात आला. रुपये मिळताच ठगबाज आरोपी फरार झाला. मानकापूर पोलीस त्याचा शोध घेत आहे. महेंद्र मगन भालेराव (४३) रा. गुमथळा, कामठी असे आरोपीचे नाव आहे.
सुमितनगर, झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी दिनेश सहारे औषध व्यापारी आहेत. त्यांची बराक फार्मासिटीकल कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून सहारे शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा करतात. एक वर्षापूर्वी आरोपी महेंद्र हा सहारे यांच्या कार्यालयात आला होता. थोड्याच दिवसात त्याच्याशी चांगली ओळख झाली. त्याने सहारे यांना आपली शासकीय अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असल्याचे सांगितले. शासकीय विभागांमध्ये औषध पुरवठा करण्यासाठी दोन कोटी रुपयाची निविदा निघाल्याचे त्याने सहारेला सांगितले. आपल्या ओळखीचा वापर करून औषध पुरवठ्याचे कंत्राट सहारेला मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्याने सांगितले की, निविदेच्या अटीनुसार त्याला १० टक्के रक्कम सुरक्षा रक्कम म्हणून जमा करावी लागेल. यासाठी सहारे तयार झाले. सहारेने जून २०१९ पासून भालेरावला रक्कम देण्यास सुरुवात केली. धनादेश व रोख रक्कम असे करीत सहारेने २२.५० लाख रुपये भालेरावला दिले. त्यानंतर तो निविदा मंजूर होत असल्याचे सांगत राहिला. अनेक दिवसपर्यंत तो टाळाटाळ करीत राहिला. सातत्याने टाळाटाळ करीत असल्याने सहारेला संशय आला. त्याने त्याच्यावर दबाव टाकला. आपले पैसे परत मागू लागला. परंतु भालेरावने रक्कम परत करण्यास नकार दिला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर सहारेने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.