गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी निलंबित पोलिसाने उकळले २२ लाख

By मनीषा म्हात्रे | Published: June 19, 2023 12:28 PM2023-06-19T12:28:04+5:302023-06-19T12:28:29+5:30

डोंगरीतील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय तक्रारदार यांचा कपड्यांचा कारखाना आहे.

22 lakhs by the suspended police to get rid of the crime | गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी निलंबित पोलिसाने उकळले २२ लाख

गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी निलंबित पोलिसाने उकळले २२ लाख

googlenewsNext

मुंबई : ड्रग्जच्या गुन्ह्यातून भावाचे नाव कमी करण्याचे आमिष दाखवून आणि कुटुंबाला ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एका निलंबित पोलिसाने एका व्यावसायिकाकडून २२ लाख उकळल्याची घटना डोंगरीत समोर आली आहे. या प्रकरणी निलंबित पोलिसासह एका खबऱ्याविरुद्ध डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या वर्दीला डाग लावणाऱ्या अशा घटनांमुळे गेल्या काही काळापासून मुंबई पोलिस दलाची बदनामी होत आहे.

डोंगरीतील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय तक्रारदार यांचा कपड्यांचा कारखाना आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची नावेद सलीम परमार ऊर्फ पाव याच्यासोबत ओळख झाली. पोलिस खबरी म्हणून काम करत असल्याचे सांगून, कामे असल्यास सांगण्यास सांगितले. 

मार्चमध्ये नावेद घरी आला. तक्रारदार यांचा मोठा भाऊ आसीफ कासम राजकोटवाला याचे नाव अमली पदार्थ विरोधी विभागाच्या वांद्रे युनिटने दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपी म्हणून आहे. युनिटमध्ये त्याच्या ओळखीचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गवारे असून त्यांना सांगून, भावाचे नाव गुन्ह्यातून काढू शकतो, असे सांगितले. 

त्यांनी दुर्लक्ष करताच, भावाचे नाव गुन्ह्यातून काढण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर त्यात  अन्य लोकांनाही अडकविण्याची भीती घातली. 

ठरल्याप्रमाणे ते गवारे याच्या युनिटमध्ये भेटण्यासाठी गेले. मात्र गवारेने युनिटमध्ये न भेटता तेथीलच हॉटेलमध्ये भेटले. तक्रारदार यांनी त्याला ओळखपत्र विचारताच तो चिडून काम करणार नाही असा ओरडला. नंतर त्याने लांबूनच पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवले. 

दोघांनी भावाचे नाव गुन्ह्यातून काढण्यासाठी ३५ लाख आणि दोन ॲपल फोनची मागणी केली. तक्रारदार यांनी एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगताच, त्याने घरच्यांना त्याच गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवत, भावाला १० वर्षाची शिक्षा होईल असे सांगितले. 

चर्चेअंती गवारेने २२ लाखांत काम होणार असल्याचा निरोप तक्रारदारांना दिला. ठरल्याप्रमाणे मार्च अखेरीस ११ लाख दिले. काही दिवसांनी गवारे दोन पानांचा पेपर घेऊन भावाचे नाव काढून टाकल्याचे सांगत, पेपरची एक कॉपी सही करून दिली. त्यानंतर, उर्वरित ११ लाख, आयफोन त्याला दिला.

२ जून - जीएसटी प्रकरणासाठी एक कोटी उकळले
जीएसटी प्रकरणातून सुटका करण्यासाठी पोलिसाने कस्टम अधिकाऱ्यांच्या मदतीने व्यावसायिकाची एक कोटीची फसवणूक केली. रेल्वे पोलिस जयेश कदमसह दोन कस्टम अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद असून पुढील तपास आग्रीपाडा पोलिस करीत आहेत.  

आधी गुन्हे नंतर निलंबित अधिकाऱ्यांची घरवापसी
मविआ सरकारच्या काळात गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या पोलिसांना पुन्हा सेवेत घेण्यास सुरुवात झाली. अंगडिया वसुली प्रकरणातील पोलिस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन कदम, समाधान जमदाडे यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतले. 

  वसुली प्रकरणात निलंबित केलेले पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनाही गुन्हे शाखेने क्लीन चिट देत, त्यांचेही निलंबन मागे घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
   बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांना धमकावून खंडणी उकळल्याप्रकरणी  पोलिस अधिकारी नंदकुमार गोपाळे, आशा कोरके यांना पुन्हा सेवेत घेतले.

पेपर कॉपीमुळे संशय 
महिनाभराने गवारेने दिलेल्या पेपरवर स्टॅम्प नसल्याने त्यांनी वकिलांना तो पेपर दाखविला. 
वकिलांनी तो  कोर्टाकडून साक्षांकित करून घेण्यास सांगितला. त्यांनी नावेदकडे याबाबत सांगताच, त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. 
१८ एप्रिल रोजी गवारेने त्यांना भेटून पेपर देण्यास सांगितले. मात्र, पेपर मिळाला नाही. अखेर १ मेपर्यंत पेपर न दिल्यास पैसे परत देण्याबाबत सांगितले. त्यानंतर, गाडीत पेट्रोल भरायचे सांगून क्रेडिट कार्ड घेऊन निघून गेला. त्यानंतर, कॉलही बंद लागला.

गवारेही नॉट रिचेबल 
  व्यावसायिकाने गवारेशी बोलणे करताच, त्यांच्याकडून काम होणार नाही. ३ मे रोजी १५ लाख परत देतील असे सांगितले. 
  ७ मे रोजी नावेदचा मोबाइलही बंद लागला. गवारे यांना कॉल केला असता तो बंद लागला. 
  यात फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिस अधिक तपास करत आहेत. 

बडतर्फ अन् ठग...
गवारे हा बडतर्फ पोलिस असून तो लोकांना पोलिस असल्याची बतावणी करून फसवणूक करत असल्याचे समोर आले. तसेच नावेद याच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. 

Web Title: 22 lakhs by the suspended police to get rid of the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.