वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे लाचखोरांची खुर्ची सुटेना, राज्यभरात २२३ लाचखोर कर्तव्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 05:41 AM2020-10-30T05:41:07+5:302020-10-30T07:16:58+5:30

bribe News : लाचखोरीच्या कारवाईत अडकलेल्यांंवर निलंबनाची कारवाई करण्यास मुहूर्त मिळत नसल्याची धक्कादायक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

223 bribe takers on duty across the state | वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे लाचखोरांची खुर्ची सुटेना, राज्यभरात २२३ लाचखोर कर्तव्यावर

वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे लाचखोरांची खुर्ची सुटेना, राज्यभरात २२३ लाचखोर कर्तव्यावर

Next

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : राज्यभरात लाचखोरीविरुद्ध जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. भ्रष्टाचार व लाचखोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याबाबत राज्य सरकारकड़ून वेळोवेळी सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात लाचखोरीच्या कारवाईत अडकलेल्यांंवर निलंबनाची कारवाई करण्यास मुहूर्त मिळत नसल्याची धक्कादायक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. राज्यभरातील २२३ लाचखोर अजूनही कर्तव्यावर हजर आहेत.

लॉकडाऊनमुळे लाचखोरीला ब्रेक लागला. मात्र अनलॉकचा टप्पा सुरू होताच लाचखोरी जैसे थे स्वरूपात पाहावयास मिळत आहे. जानेवारी ते २७ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात ५४७ गुन्हे नोंद असून त्यात ५१३ सापळा कारवाई आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा २०१ ने कमी आहे. यात ७०३ आरोपी एसीबीच्या जाळ्यात अडकले असून एसीबीच्या  पुणे परिक्षेत्रात सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत. यापैकी अवघ्या १० प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

कोणाच्यातरी कृपाशीर्वादामुळे  हे लाचखोर वर्षानुवर्षे  खुर्चीला चिकटून आहेत. २०१३ पासून आतापर्यंत लाचखोरी प्रकरणी कारवाई होऊनही २२३ लाचखोरांचे निलंबन करण्यात आलेले नाही. यात, नांदेड परिक्षेत्रातील सर्वाधिक ५५ तर नागपूर परिक्षेत्रातील ५१ लाचखोरांचा समावेश आहे. त्यातही महसूल/नोंदणी/ भूमिअभिलेख (३०), ग्रामविकास (४८), शिक्षण-क्रीडा (४६), सहकार, पणन व वस्त्रोद्योग (१५) आणि पोलीस होमगार्ड आणि कारागृह विभागातील (१०) जणांचा समावेश आहे. तर अन्य विभागांतील प्रत्येकी १ ते ४ जणांचा समावेश आहे. 

जनजागृती सप्ताह
२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान राज्यभरात लाचखोरीविरोधात दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. कोणी भ्रष्टाचार करताना आढळून आल्यास एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य सरकारने 
केले आहे.  

Web Title: 223 bribe takers on duty across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.