२३ लाखाची बनावट जंतुनाशके जप्त; गोडाउनवर छापा टाकून पोलीसांची कारवाई, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 08:36 PM2021-06-07T20:36:40+5:302021-06-07T20:36:53+5:30
रविवारी संध्याकाळी मिळालेल्या माहितीद्वारे संशयास्पद ठिकाणावर पाळत ठेवली होती.
नवी मुंबई: पावणे येथे छापा टाकून पोलीसांनी बनावट हॅन्ड वॉश व जंतू नाशकांचा साठा जप्त केला आहे. त्याठिकाणी २३ लाख रुपये किमतीची बनावट उत्पादने आढळून आली आहेत. नामांकित कंपन्यांचे ट्रेडमार्क लावून या उत्पादनांची विक्री केली जात होती. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
पावणे एमआयडीसी मधील गामी इंडस्ट्रियल पार्क याठिकाणी बनावट उप्तादनाचा साठा असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी पथक केले होते. त्यात निरीक्षक सुनील कदम, सहायक निरीक्षक प्रभाकर शिऊरकर, हवालदार परशुराम मराडे, सोमनाथ वने, प्रताप यादव, संतोष बडे, दत्तू सांबरे, राजेश आघाव, सुनील सकट, दत्तात्रेय एडके आदींचा समावेश होता.
रविवारी संध्याकाळी मिळालेल्या माहितीद्वारे संशयास्पद ठिकाणावर पाळत ठेवली होती. त्याद्वारे खात्री पटताच पथकाने एका गाळ्यावर छापा टाकला असता तिथे हात धुण्यासाठी वापरली जाणारी जंतू नाशके, हॅन्ड वॉश, एअर फ्रेशनर भांडी अथवा कपडे धुण्यासाठी वापरले जाणारी उत्पादने आढळून आली. त्यात गोदरेज, हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर इंडिया व इतर अनेक कंपन्यांचे ट्रेडमार्क लावून तयार केलेल्या बनावट उत्पादनांचा समावेश होता.
हा सर्व साठा पोलीसांनी ताब्यात घेऊन संबंधित कंपन्यांमार्फत त्याची चाचपणी करण्यात आली. यावेळी सर्व उत्पादने बनावट असल्याची खात्री झाल्यानंतर गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली आहे. विनोद हिरजी डुबरीया (३२) असे त्याचे नाव असून तो अंधेरीचा राहणारा आहे. त्याच्याकडून तब्बल २६ लाख ४४ हजार रुपयांची बनावट उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये त्याच्या इतरही साथीदारांचा सहभाग असल्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.