सोने-चांदीच्या दुकानातून दिवसाढवळ्या २३.६० लाखांचा ऐवज लंपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 05:12 PM2018-07-07T17:12:23+5:302018-07-07T17:15:39+5:30
मालेगाव (वाशिम) : शहरातील दुर्गा चौकस्थित एका सोने-चांदीच्या दुकानातून दिवसाढवळया २३ लाख २२ हजाराचे सोने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम ठेवून असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : शहरातील दुर्गा चौकस्थित एका सोने-चांदीच्या दुकानातून दिवसाढवळया २३ लाख २२ हजाराचे सोने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम ठेवून असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवार, ७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, मंगरूळपिरमध्ये ५ ते ६ जुलैच्या रात्री सोने-चांदीच्या दोन दुकानांमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेचा तपास अद्याप लागला नसताना मालेगावातही धाडसी चोरी झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे सिद्ध होत असून पोलिसांच्या कार्यकर्तुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मालेगावातील चोरी प्रकरणासंबंधी प्राप्त माहितीनुसार, शहरातील दुर्गा चौकात प्रविण वर्मा यांचे दुर्गा ज्वेलर्स या नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. वर्मा यांनी नेहमीप्रमाणे ७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता दुकान उघडले व त्यांनी साफसफाई झाल्यानंतर पुजापाठ सुरू केला. यावेळी दुकानाबाहेर उभा राहून एक अज्ञात व्यक्ती पाळत ठेवून होता. त्याने वर्मा यांना ‘आपकी चप्पल कोई उठाके ले गया’, असे म्हटले. त्यामुळे वर्मा हे चप्पलचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले असता, संधीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने वर्मा यांची ७७५ ग्रॅम सोने (किंमत २३ लाख २२ हजार) आणि ४० हजार रुपये रोख ठेवलेली बॅग पळविली. यापक्ररणी प्रविण वर्मा यांनी मालेगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांकडून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले. तसेच श्वानपथक व फिंगर प्रिंट तज्ज्ञांचीही याकामी मदत घेतली जात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक योगेश धोत्रे यांनी दिली.