अश्लील नृत्य करताना ऑर्केस्ट्रा बारमध्ये सापडल्या तब्बल २४ बारबाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 09:58 PM2020-02-05T21:58:40+5:302020-02-05T22:03:32+5:30
ग्राहक व बार कर्मचारी यांच्यासह ३३ जणांना अटक
मीरारोड - काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील नाईट लाईफ ( सनसिटी ) या ऑर्केस्ट्रा बारवर पोलीस उपअधीक्षक शशिकांत भोसले आणि पथकाने मंगळवारी रात्री धाड टाकली असता बारमध्ये तब्बल २४ बारबाला अश्लिल नाच करताना आढळून आल्या. पोलीसांनी त्या बारबालांची सुटका करत बारमध्ये अय्याशी करणाऱ्या ग्राहकांसह बारचे कर्मचारी आदी मिळुन ३३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर बारचे चालक - मालकाचा शोध सुरु आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड व अपर अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार भोसले व त्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास सनसिटी ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकली. या धाडीत ऑर्केस्ट्रा बारमध्ये केवळ ४ गायिकांना ठेवण्याची परवानगी असताना तब्बल २४ बारबाला बारचालकाने ठेवल्या होत्या. बारबाला आकर्षक व तोकडे कपडे घालून अश्लिल नाच करत होत्या.
सदर बारमध्ये बारचे चालक - मालक, कर्मचारी व ग्राहकांकडून सदर बारबालांना अश्लिल नृत्य करण्यास संगनमताने प्रोत्साहित केल्याप्रकरणी तसेच ऑर्केस्ट्रा बारमध्ये नाचण्यास प्रतिबंध असल्याने ३४ जणांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अय्याशी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसह बार कर्मचारी, बाऊंसर आदी ३३ जणांना पोलीसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुजरात, चंदिगड, मुंबई आणि मीरा भाईंदरमधील ग्राहकांचा समावेश आहे. या घटनेने शहरातील ऑर्केस्ट्रा बारमध्ये सर्रास बारबालांना नाचवले जात असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.