एटीएम फोडून २४ लाख रुपये पळविले, हिंगणातील डोंगरगाव येथील घटना

By दयानंद पाईकराव | Published: September 24, 2023 03:58 PM2023-09-24T15:58:04+5:302023-09-24T15:58:24+5:30

हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजा डोंगरगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे.

24 lakh rupees were stolen by breaking the ATM, an incident at Dongargaon in Hingana | एटीएम फोडून २४ लाख रुपये पळविले, हिंगणातील डोंगरगाव येथील घटना

एटीएम फोडून २४ लाख रुपये पळविले, हिंगणातील डोंगरगाव येथील घटना

googlenewsNext

नागपूर : हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत डोंगरगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून २४ लाख २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. ही घटना शुक्रवारी २२ सप्टेंबरला रात्री ८.३० ते २३ सप्टेंबरच्या सकाळी सहा दरम्यान घडली. यात सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दोन आरोपी एटीएम फोडताना आढळले आहेत. परंतु त्यांनी तोंडाला दुपट्टा बांधलेला असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही.

हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजा डोंगरगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. शुक्रवारी मध्यरात्री तोंडाला दुपट्टा बांधलेल्या दोन आरोपींनी एटीएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीनच्या उजव्या बाजुचा लोखंडी बोल्ट कापून मशिनमधील २४ लाख २१ हजार २०० रुपये तसेच चार कॅसेट व मागील रुमच्या दाराचे कुलुप तोडून त्यातील नेटवर्क मॉडेम चोरून नेले. 

या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे महाव्यवस्थापक जितेंद्र आसाराम बसाखेत्रे (वय ३५, रा. उदयनगर हुडकेश्वर)यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वाघ यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४५७, ३८०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

या घटनेत सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दोन आरोपी एटीएम फोडताना दिसत आहेत. परंतु त्यांनी तोंडावर दुपट्टा बांधलेला असल्यामुळे त्यांची ओळख पटु शकली नाही. यात आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता हिंगणा पोलिसांनी वर्तविली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: 24 lakh rupees were stolen by breaking the ATM, an incident at Dongargaon in Hingana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.