उल्हासनगरात २४ टन ८३० किलो काळा गुळाचा साठा जप्त; हिललाईन पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 03:34 PM2022-06-02T15:34:18+5:302022-06-02T15:35:21+5:30
गावठी दारू साठी वापरण्यात येणारा काळा गुळाचा मोठा साठा हिललाईन पोलिसांनी बुधवारी रात्री एका गोडाऊन मधून जप्त केला.
सदानंद नाईक
उल्हासनगर : गावठी दारू साठी वापरण्यात येणारा काळा गुळाचा मोठा साठा हिललाईन पोलिसांनी बुधवारी रात्री एका गोडाऊन मधून जप्त केला. याप्रकरणी तरुण चांदवानी याच्यावर गुन्हा दाखल केला असून तब्बल २४ टन ८३० किलो गुळाचा साठा जप्त केला.
उल्हासनगरातील हिललाईन पोलिसांना कॅम्प नं-५ प्रेमनगर टेकडी येथील श्रद्धा लोक आश्रमाच्या समोरील एका बंद गळ्यातून सडलेल्या गुळाची दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाली. बुधवारी रात्री साडे वाजता दुर्गंधी येत असलेले गोडाऊन उघडले असता, प्लास्टिक व इतर पिशव्यात सडलेल्या काळा गूळ असल्याचे उघड झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित ढेरे यांच्या आदेशानुसार गूळ ट्रक मधून हिललाईन क्वाटर्सच्या खोलीत जप्त करण्यात आला. तब्बल २४ टन ८६० किलो गूळ जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ८ लाख ७० हजार १०० रुपये आहे. तसेच ४८० गोण्या मध्ये गूळ साचून ठेवण्यात आला होता. हिललाईन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार बुधवारी रंजित ढेरे यांनी घेतल्यावर, पहिल्याच दिवशी मोठी कामगिरी केली. तर लक्ष्मण सारिपुत्र हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाजीमलंग पट्ट्यातील अनेक गावात गावठी दारूचे अड्डे असून त्यांच्यावर हिललाईन पोलिस व शहर गुन्हे अन्वेषण विभागाने वेळोवेळी यापूर्वी कारवाई केली. तर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळे, माणेरे, चिंचपाडा आदी गाव हद्दीत गावठी दारूचे अड्डे असून त्यावरही यापूर्वी अनेकदा कारवाई झाली. याकारवाईने गावठी दारू धंदेवाईकांचे कंबरडे मोडले असून यामागील सूत्रधार पोलिसांनी शोधून काढावा, अशी मागणी होत आहे.