अतिरेकी संघटनेशी संबंध, बोईसरमधून २४ वर्षीय तरुणास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 08:39 AM2023-02-12T08:39:23+5:302023-02-12T08:39:47+5:30
हमराजने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला असून गेली तीन वर्षे ताे सौदी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये कामाला होता.
पंकज राऊत/हितेन नाईक
पालघर/बोईसर : अल कायदा आणि आयसिसशी संबंध असल्याच्या सबळ पुराव्याच्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बोईसरच्या सोमनाथ पॅराडाइज कॉम्प्लेक्समध्ये राहत असलेला उच्चशिक्षित तरुण हमराज शेख (वय २४) यास अटक केली आहे. बोईसर पोलिस ठाण्यात त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत नेण्यात आले आहे.
हमराजने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला असून गेली तीन वर्षे ताे सौदी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये कामाला होता. गेल्या नोव्हेंबर महिन्यात तो भारतात परतला होता. सौदीतील मुक्कामात तो आयसिसच्या संपर्कात आला होता. मुंबईत आल्यानंतर तो बंगळुरू येथून अटक केलेल्या मोहंमद आरिफ याच्या संपर्कात होता. आयसिसने चालवलेल्या ऑनलाइन मोहिमेत भाग घेत तो अन्य काही जणांच्याही संपर्कात होता.
हमराज यास पोलिसांनी शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास बोईसर येथील अवधनगरमधील त्याच्या वडिलांच्या दुकानातून ताब्यात घेतले. त्याच्या फ्लॅटची पोलिसांनी तपासणी केली. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत बोईसर पोलिस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू होती. त्याच्याकडून मोबाइल आणि लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला आहे.
३० वर्षांपासून कुटुंबाचे वास्तव्य
हमराज शेखचे कुटुंब ३० वर्षांपासून बोईसर येथे राहत असून त्याच्या वडिलांचे अवधनगर येथे चपलांचे दुकान आहे. हमराजचे माध्यमिक शिक्षण चिन्मया स्कूल येथे तर दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण टीव्हीएम स्कूल, बोईसर येथे झाले आहे. त्याने डहाणूतील रुस्तमजी स्कूलमधून हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला आहे. शिक्षणानंतर तो केरळ आणि सौदी अरेबिया येथे तीन वर्षे नोकरीसाठी गेला होता. नोव्हेंबर महिन्यात भारतात परतल्यानंतर आपल्या वडिलांना तो दुकानात मदत करीत होता.