रोडरोमिओंना पोलिसांचा हिसका, २४ तरुणांना ताब्यात घेऊन केली धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 12:51 AM2019-02-09T00:51:00+5:302019-02-09T00:51:17+5:30
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाबाहेर विनाकारण घुटमळणाऱ्या वीसहून अधिक रोडरोमिओंची लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (दि. ८) धरपकड केली.
उरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाबाहेर विनाकारण घुटमळणाऱ्या वीसहून अधिक रोडरोमिओंची लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (दि. ८) धरपकड केली. महाविद्यालयात प्रवेश नसतानाही, महाविद्यालयाच्या परिसरात तसेच महाविद्यालयाच्या बाहेर फिरणाºया २४ तरुणांना ताब्यात घेऊन चांगलीच धुलाई केली.
सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान व त्यांच्या सहकाºयांनी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश करून परिसरात फिरणाºया युवकांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडे असणाºया वाहनांच्या कागदपत्रांचीही तपासणी केली. यात २४ टारगट मुले परवानगी नसतानाही विनाकारण महाविद्यालयाच्या आवारात फिरताना आढळले. पोलिसांनी संबंधित युवकांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना चांगलाच चोप दिला. तसेच संबंधितांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून आपल्या पाल्याचे प्रताप त्यांना सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान म्हणाल्या, शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश नसतानादेखील विनाकारण शाळा-महाविद्यालयांबाहेर टवाळखोर आणि टारगट तरुणांची गर्दी पाहायला मिळते. विनाकारण वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, स्टंटबाजी करणे यासारखे उद्योग या टवाळखोरांकडून केले जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढते आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो म्हणून अशा रोडरोमिओंवर वेळोवेळी कायदेशीर कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठीच आजची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सातत्याने चालू राहणार आहे. टारगट मुलांनी व त्यांच्या पालकांनी दक्षता घ्यावी अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल. दरम्यान यावेळी सुवर्णा हुलवान यांनी महाविद्यालयीन युवतींशीही संवादही साधला.