विषारी दारूने घेतला २५ जणांचा बळी; बिहारमधील प्रकार; १५ जण अत्यवस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 06:49 AM2022-12-15T06:49:37+5:302022-12-15T06:49:55+5:30
सर्व मृतांनी सोमवारी रात्री उशिरा मद्यप्राशन केले होते. त्यानंतर मंगळवारी ते आजारी पडले.
- एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : दारूबंदी लागू असूनही बिहारमध्ये छपरा जिल्ह्यात विषारी दारूमुळे २५ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच असली तरी जिल्हा प्रशासनाने याबाबत मौन बाळगले आहे. या प्रकरणी पिता-पुत्रासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवरून राजकारण तापले असून, भाजप सरकारच्या कालावधीतही अशा घटना घडल्या होत्या, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिले आहे.
सर्व मृतांनी सोमवारी रात्री उशिरा मद्यप्राशन केले होते. त्यानंतर मंगळवारी ते आजारी पडले. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. या घटनेतील १५ जण अत्यवस्थ आहेत व इतर अनेक जण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. अनेकांचे डोळे गेले आहेत तर काही जण प्राणास मुकले आहेत.
तुम्ही दारुडे आहात : नितीश कुमार
या मुद्द्यावरून बिहार विधानसभेत विरोधकांनी जोरदार हंगामा केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे नितीशकुमार कमालीचे संतापले. भाजप नेत्यांवर टीका करताने ते म्हणाले की, तुम्ही दारुडे आहात. यावर भाजपचे खासदार सुशील मोदी म्हणाले की, नितीश कुमार यांची स्मरणशक्ती गेली आहे. लहान-सहान गोष्टींमुळे त्यांना सतत राग येतो.
गावावर शोककळा
संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह राज्य महामार्गावर ठेवून आंदोलन केले. सारणचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात छापेमारी करून ४० पेक्षा अधिक लोकांना गजाआड केले आहे. तसेच या घटनेतील तिघांना अटक केली आहे.