२५ किलाेमीटर केला आरोपीचा सिनेस्टाइल पाठलाग; तीन दिवस सुरु ठेवली शाेधमाेहिम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 06:31 PM2021-08-02T18:31:11+5:302021-08-02T18:31:57+5:30
Crime News : उदगीरच्या खूनप्रकरणातील फरार; आराेपीस कर्नाटकच्या जंगलातून अटक
लातूर : उदगीर येथील एका युवकाचा क्षुल्लक कारणावरुन चाकूने भाेसकून खून करणाऱ्या फरार आराेपीला कर्नाटकातील एका जंगलातून लातूर पाेलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करत अटक केली. तब्बल २५ किलाेमीटरचा पाठलाग करत पाेलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील महत्मा बसवेश्वर चाैकात साेन्या नाटकरे आणि जगदीश किवंडे याच्यामध्ये डाेळे वटारुन का बघताेस? म्हणून बाचाबाची झाली. दरम्यान, साेन्या फर्फ अमित नाटकरे याने जगदीश किवंडे याच्या पाेटावर धारधार शस्त्राने वार केले. यामध्ये जगदीश हा गंभीर जखमी झाला. ही घटना २९ जुलैच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. गंभीर युवकावर उदगीर येेथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले हाेते. दरम्यान, लातूरला जात असताना वाटेतच जखमी युवकाचा मृत्यू झाला. याबाबत उदगीर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेपासून साेन्या उर्फ अमित नाटकरे हा फरार झाला हाेता. त्याच्या अटकेसाठी जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी वेगवेगळी तीन पथके नियुक्त केली हाेती. तर स्थानिक गुन्हे शाखेचे दाेन पथके तैनात करण्यात आली हाेती. ३० जुलै राेजी आराेपी साेन्या नाटकरे हा माेघा रेल्वे पाटरीवरच्या मार्गावर पायी फिरत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. पाेलिसांनी शाेध घेतला असता, ताे रावणगाव येथून नातेवाईक गणेश उत्तमराव झेले याला सोबत घेवून माेटारसायकलवरुन (मुडबी ता.बस्वकल्याण जि. बीदर) येथे गेल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी बहिणीचे गाव गाठले आणि चाैकशी केली. दरम्यान, दाेघे जण जंगलाच्या दिशेने गेल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. पाेलिसांनी जंगलात त्यांचा शाेध घेतला. तीन दिवस ही शाेध माेहीम सुरुच हाेती. अखेर साेन्या उर्फ अमित नाटकरे आणि त्याला मदत करणारा गणेश झेले यास पाेलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करत ताब्यात घेतले. त्याला उदगीर शहर पाेलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
अटकेतील आरोपी सोन्या उर्फ अमित नाटकरे याला उदगीर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाेलीस काेठडी सुनावली आहे. तपास पोउपनि व्ही.आय.ऐडके करीत आहेत.