साखरपुड्याला निघालेली बस किवळे पुलावर पलटली; २५ प्रवासी जखमी, तिघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 05:10 PM2020-12-27T17:10:11+5:302020-12-27T17:14:25+5:30
Bus Accident in Pune, PCMC: सर्व जखमींना निगडी व चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
किवळे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने शहापूरहून सांगलीला निघालेली प्रवासी बस वळणाचा अंदाज न आल्याने किवळे उड्डाणपूलावर रविवारी दुपारी १२ च्या सुमारास पलटली. या अपघातात साखरपूड्याला चाललेले ४० पैकी २५ प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने ४० प्रवासी घेऊन जाणारी भरधाव खाजगी बस किवळे पूलावर रस्त्याच्या कडेला पलटली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलटली. बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना निगडी व चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
साखरपुड्याच्या समारंभासाठी सर्व प्रवासी या बसने शहापूरहून (ठाणे ) सांगलीकडे निघाली होती, अशी माहिती मिळाली आहे. अपघातानंतर महामार्ग पोलीस, देहू रोड पोलीस, देवदूत यंत्रणा ,स्थानिक युवक व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे.