२५ हजारांची लाच; वाशिमच्या ठाणेदारासह ‘रायटर’ला अटक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 05:10 PM2018-07-06T17:10:20+5:302018-07-06T17:12:16+5:30
वाशिम : शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल एका प्रकरणात तक्रारदाराला मदत करण्यासाठी पोलीस हवालदार विजय जेमला राठोड (वय ५०) यांना २५ हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल एका प्रकरणात तक्रारदाराला मदत करण्यासाठी पोलीस हवालदार विजय जेमला राठोड (वय ५०) यांना २५ हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस निरिक्षक विजय गोवर्धन पाटकर (वय ५१) यांनाही आरोपी करण्यात आल्याची माहिती अमरावती एसीबीच्या पथकाने दिली. हा प्रकार ६ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
वाशिम शहर पोलीस स्टेशनअंतर्गत काही दिवसांपूर्वी खडसे नामक एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यापूर्वी खडसे यांनी ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली होती. त्यावरून पोलीसांनी भादंवी ३०६ अन्वये आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्याच घटनेतील आरोपीला मदत करण्यासाठी ठाणेदार विजय पाटकर यांनी त्यांचे रायटर विजय राठोड याच्यामार्फत २५ हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार अमरावती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली.
यासंदर्भात १९ जून रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यात सत्यता आढळून आली. दरम्यान, ६ जुलै रोजी लाचेची रक्कम देण्याचे ठरले असता, अमरावती एसीबीच्या पथकाने शहर पोलीस स्टेशनच्या आवारातच सापळा रचला. यावेळी हवालदार विजय राठोड याने तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच स्विकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यास रंगेहात ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस निरिक्षक विजय पाटकर यांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक अमरावती विभागाचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, चेतना तिडके, पोलीस उपअधिक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात अमरावती येथील एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी केली.