गेल्या ३ दिवसात पकडली २.५० कोटींची वीजचोरी

By सचिन लुंगसे | Published: November 18, 2022 07:15 PM2022-11-18T19:15:41+5:302022-11-18T19:16:14+5:30

धाडीमध्ये १९८ वीजचोरांना दणका

2.50 crore electricity theft caught in last 3 days | गेल्या ३ दिवसात पकडली २.५० कोटींची वीजचोरी

गेल्या ३ दिवसात पकडली २.५० कोटींची वीजचोरी

googlenewsNext

मुंबई: वीजचोरी करणाऱ्या वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरण आक्रमक झाली असून गेल्या एका आठवड्यात कोकण, पुणे, औरंगाबाद व नागपूर परिक्षेत्रातील विविध ठिकाणी घालण्यात आलेल्या धाडीमध्ये १९८ वीजचोरांना दणका देत अंदाजित २ कोटी ५० लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात यश मिळवले आहे. यात सर्वाधिक १० वीजचोऱ्या एकट्या ठाणे शहरातील  आहेत.

मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करूनही वीज ग्राहकास कमी रकमेचे देयक कसे जाते, अशा ग्राहकांविरूध्द कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते. मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करून येणाऱ्या मोठ्या रकमेचे देयक टाळण्यासाठी वीजचोरांनी त्यांच्याकडे असलेल्या मीटरमध्ये फेरफार केली असावी असा संशय आल्याने महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने मीटरची तपासणी करण्यासाठी विविध पथके तयार केली. या पथकांनी नागपूर, औरंगाबाद, पुणे व कोंकण परिक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकून जास्त वीज वापर असलेल्या मात्र कमी वीजबिल  येणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.  

या सर्व मीटरची तपासणी केली असता जवळपास सर्वच वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. हे सर्व मीटर जप्त करून त्याची प्रयोग शाळेत तपासणी केली असता यासर्वच १९८ वीजग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. एकट्या कोंकण परिक्षेत्रातील वीजचोरीचे मुल्याकंन करण्यात आले  असून येथील वीजग्राहकांनी एकूण ७ लाख ४४ हजार ११४ युनिटचा अनधिकृतपणे वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. या वीजचोरीची  अनुमानित रक्कम १ कोटी २२ लाख रुपये असून या ग्राहकांना वीजचोरीचे देयक देण्यात आले आहे. उर्वरित पुणे, औरंगाबाद व नागपूर परिक्षेत्रात पकडण्यात आलेल्या वीजचोरीच्या मुल्यांकनांची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे.
 
सदर वीजचोरीची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नियमानुसार मुदत देण्यात आली असून   विहित कालावधीत या ग्राहकांनी वीजबिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरूध्द  विद्युत कायदा- २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. वीजचोरी करणे हा दंडनीय अपराध आहे. वीजचोरीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास वीजचोरी करणाऱ्या ग्राहकास सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात वीजचोरांच्या विरोधात महावितरण अधिक आक्रमक होणार आहे. वीज वितरण हानी कमी करून महसुलात वाढ करणे तसेच महसूल वसुलीची क्षमता वाढवून महावितरणला आर्थिक सुद्दढता प्रदान करण्यासाठी  महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मोहीमा राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वीजचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. ग्राहकांनी अधिकृतपणेच विजेचा वापर करावा. कुठल्याही प्रकारची वीजचोरी करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

Web Title: 2.50 crore electricity theft caught in last 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.