बजरंगबलीची २५० वर्षे जुनी अष्टधातूची मूर्ती चोरीला, परिसरात खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 01:54 PM2023-09-21T13:54:11+5:302023-09-21T13:57:21+5:30
ही घटना काल मंगळवारी रात्री घडली. मात्र, चोरीला दोन दिवस उलटले तरी पोलिसांना कोणताचा सुगावा लागला नाही.
सारण : बिहारच्या छपरा जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छपरा येथील धार्मिक नगरी असलेल्या रीविलगंजमध्ये चोरट्यांनी ४० कोटी रुपयांची बजरंगबलीची अष्टधातूच्या मूर्तीची चोरी केल्याची घटना घडली. ४२ किलो वजनाची ही मूर्ती २५० वर्षे जुनी होती. ही घटना काल मंगळवारी रात्री घडली. मात्र, चोरीला दोन दिवस उलटले तरी पोलिसांना कोणताचा सुगावा लागला नाही.
यापूर्वीही धार्मिक नगरी रीविलगंज परिसरातील अनेक मंदिरांमधून मूर्तींची चोरी झाल्याचे समोर आले आहे. परंतु, अनेक घटनांमध्ये प्रशासन मूर्ती शोधण्यात अपयशी ठरते. पुन्हा एकदा चोरट्यांनी प्रशासनाला आव्हान देत ४० कोटी रुपयांची मूर्ती चोरून नेली आहे. मूर्ती चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. जिल्ह्यात चोरट्यांच्या वाढत्या दहशतीने जनता हैराण झाली असून, चोरांवर कारवाई करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
महंतांच्या म्हणण्यानुसार, मठात काही वर्षांपूर्वी चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या, त्यामध्ये चोरट्यांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्ती पळवून नेल्या होत्या. पहिल्या चोरीत मूर्ती मठाच्या बागेतच जमिनीत गाडलेल्या अवस्थेत सापडली होती, मात्र त्यानंतरच्या चोरीत मूर्ती परत मिळू शकली नाही. गेल्या काही वर्षांपासून सारण जिल्ह्यातील विविध भागातील मंदिरे आणि मठांमध्ये बसवण्यात आलेल्या प्राचीन आणि मौल्यवान मूर्तींवर चोरट्यांची नजर होती. अनेक घटनांमध्ये अद्यापही मूर्ती सापडलेल्या नाहीत.