२५ हजार जणांचे बनवले सव्वा दोन कोटी फॉलोअर्स; सिव्हिल इंजिनीयरला सीआययूकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 01:10 AM2020-07-23T01:10:02+5:302020-07-23T01:10:09+5:30
एवीएमएसएमएम’ नावाची कंपनी थाटून हा धंदा सुरू केला होता.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : बनावट फॅन्स फॉलोअर्स प्रकरणात मुंबईच्या सिव्हिल इंजिनीयर तरुणाने तब्बल २५ हजार जणांचे सव्वा दोन कोटी फॉलोअर्स बनविल्याची धक्कादायक माहिती गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या (सीआययू) कारवाईतून उघड झाली आहे. कशिफ मन्सूर (३०) असे तरुणाचे नाव असून, त्याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. यात, मुंबईसह राज्यभरातील स्ट्रगलर, पडद्यामागील कलाकार, मालिका, नाटक, चित्रपटांत छोट्या भूमिका साकारणाऱ्यांचाही समावेश आहे.
मन्सूर हा मुंबईचा रहिवासी आहे. त्याने ‘एवीएमएसएमएम’ नावाची कंपनी थाटून हा धंदा सुरू केला होता. सीआययूचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर, तपासादरम्यान मन्सूर पथकाच्या हाती लागला. त्याच्या चौकशीत त्याने आतापर्यंत २५ हजार जणांना २ कोटी ३० लाख बनावट फॉलोअर्सची विक्री केल्याचे समोर आले. यात, सुरुवातीला बनावट अकाउंटद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करणाऱ्यांना टार्गेट केले. रेटकार्ड दाखवून तो फॉलोअर्सची विक्री करत होता. कलाकार मंडळी त्याच्या जाळ्यात अडकली आणि प्रसिद्धीसाठी त्यांनी बनावट फॉलोअर्सचा आधार घेतला. यात, मन्सूरने कोट्यवधी रुपये कमावले असून, त्याची अधिक चौकशी सुरू आहे.
त्या दोन अभिनेत्रींचीही होऊ शकते चौकशी
इन्स्टिट्यूट आॅफ कंटेंपररी म्युझिकने गेल्या वर्षी बनावट फॅन्स फॉलोअर्सप्रकरणी प्रसिद्ध केलेल्या अहवालात बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये भूमिका साकारणाºया दोन बड्या अभिनेत्रींचे ४५ टक्क्यांहून अधिक बनावट चाहते असल्याचा दावा केला होता. हा अहवालही सीआययूने चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे गरज पडल्यास त्यांनाही चौकशीसाठी बोलावू शकतो, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
दवडेची रवानगी न्यायालयीन कोठडीत
बनावट फॅन्स प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या अविनाश दवडे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याने फॉलोअर्स कार्ट संकेतस्थळाच्या माध्यमांतून ९ लाख रुपये कमावले होते.
असे होते रेटकार्ड
टिष्ट्वटर फॉलोअर्स - २४२ रुपये
कमीतकमी २०, जास्तीतजास्त ५००
टिष्ट्वटर कमेंट - ३ हजार १४२ रुपये
कमीतकमी १०, जास्तीतजास्त १००
इंस्टाग्राम फॉलोअर्स - १८९.४५ रुपये
कमीतकमी १००, जास्तीतजास्त ५०००
इंस्टाग्राम व्हिडीओ लाइक्स : ११६ रुपये
कमीतकमी १००, जास्तीतजास्त १००००
इंस्टाग्राम कमेंट्स - १८९ रुपये
कमीतकमी ५०, जास्तीतजास्त ३०,०००