‘२६/११’तील पराक्रमी अधिकाऱ्याच्या सन्मानाला दशकानंतर मुहूर्त !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 08:39 PM2019-01-28T20:39:17+5:302019-01-28T20:39:49+5:30

केंद्रीय गृह विभागाचे पराक्रम पदक बहाल; कामा रुग्णालयात केला होता अतिरेक्यांशी प्रतिकार

'26 / 11 ', the honor of the mighty officer of the muharur after a decade! | ‘२६/११’तील पराक्रमी अधिकाऱ्याच्या सन्मानाला दशकानंतर मुहूर्त !

‘२६/११’तील पराक्रमी अधिकाऱ्याच्या सन्मानाला दशकानंतर मुहूर्त !

googlenewsNext

जमीर काझी

मुंबई  -  ‘२६/११’च्या दहशतवादी हल्यावेळी कामा रूग्णालयातील रुग्ण आणि परिचारिकांच्या सुरक्षेसाठी अपुऱ्या शस्त्रानिशी अतिरेक्यांशी लढणाऱ्या शौर्यवान पोलीस अधिकाऱ्याच्या सन्मानाला दशकाचा कालावधी उलटल्यानंतर मुहूर्त मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून निरीक्षक विजय तुकाराम पोवार यांना पराक्रम पदक बहाल करण्यात आले आहे. सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोवार यांना प्रजासत्ताक दिनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी बहाल करण्यात आले. २०१३ साली त्यांना ते जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तब्बल ६ वर्षानंतर प्रदान करण्यात आले आहे.
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्यावेळी तत्कालिन अप्पर आयुक्त सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली कामा रुग्णालयात गेलेल्या आठजणाच्या पथकात विजय पोवार यांचा समावेश होता. अतिरेकी अजमल कसाब व अबू जिंदाल यांच्याशी लढताना गोळी व हॅण्डग्रेनेडचे तुकडे दंड व मांडीत घुसून जायबंदी झाले होते. सुमारे ४ महिने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. २६/११ च्या हल्यात अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे , विजय साळकस्कर व मेजर उन्नीकृष्णन यांना अशोक चक्र तर निरीक्षक शशीकांत शिंदे यांना परवीर चक्रांने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याशिवाय अन्य अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती शौर्यपदकाने गौरविण्यात आले आहे. हल्याच्या घटनेला तब्बल ५,६ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते घोषित करण्यात आले. त्यामध्येही मोठा पक्षपात झाल्याचे आरोप पोलीस वर्तुळातून होत राहिला. शौर्यपदकापासून वंचित ठेवण्यात आलेल्या १४ अधिकारी, अंमलदारांना अखेर टप्याटप्याने पराक्रम पदक जाहीर करण्यात आले. तत्कालिन सहाय्यक निरीक्षक विजय पोवार यांना २०१३ रोजी केंद्राने पराक्रम पदक जाहीर केले होते. मात्र, त्याचे वितरण करण्यात आले नव्हते. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आल्यानंतर गेल्या महिन्यात केंद्राकडून पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आले. अखेर प्रजासत्ताक दिनाच्या ध्वज संचलनावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विजय पोवार यांना वितरीत करण्यात आले. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
काय घडले होते कामा रुग्णालयात ...
‘२६/११’च्या रात्री अजमल कसाब व अबु जिंदाल यांनी सीएसएमटी स्थानकातून कामा रुग्णालयात मोर्चा वळविल्यानंतर तत्कालिन अप्पर आयुक्त सदानंद दाते हे आझाद मैदान पोलीस ठाण्यात आले. त्याठिकाणी नियुक्तीला असलेल्या तत्कालिन सहाय्यक निरीक्षक पोवार व अन्य पथकाला सोबत घेवून कामा हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांच्याकडे पुरेशी बुलेट प्रफु जॅकेट, स्टेनगनही नव्हत्या. टेरेसवर लपून बसलेल्या अतिरेक्यांनी पोलिसांच्या दिशेने हॅण्डग्रेनेड फेकले आणि एके-४७मधून अंधाधुद गोळीबार केला होता. त्यामध्ये उपनिरीक्षक प्रसाद मोरे, कॉन्स्टेबल खांडेकर शहीद झाले. तर दाते, निरीक्षक विजय शिंदे, विजय पोवार आदी गंभीर जखमी झाले होते. त्याही स्थितीत बेशुद्ध होईपर्यत सुमारे १५-२० मिनिटे अतिरेक्यांना रोखून धरले होते.
अद्यापही दोघे पदकाच्या प्रतिक्षेत !
‘२६/११’च्या वेळी कामा रुग्णालयात गेलेल्या दाते यांच्या पथकातील जखमी निरीक्षक विजय शिंदे व कॉन्स्टेबल सचिन टिळेकर यांना २०११ साली सरकारने पराक्रम चक्र जाहीर करण्यात आले आहे. मात्र आठ वर्षे उलटूनही त्यांना ते वितरित करण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकारच्या अन्य घोषणेप्रमाणे ही ‘फसवी’ ठरतेय का, अशी भिती व्यक्त होत आहे.
मुंबईतील नऊ अंमलदारांना पराक्रम पदक बहाल
मुंबईवरील दहशतवादी हल्यावेळी शोर्याने लढलेल्या हवालदार शिंदे, मुरलीधर झोले, निवृत्ती गव्हाणे, प्रविण सावंत, बंडू मोरे, शंकर पवार, विनय दांडगवल, शंकर व्हदे, संजय गोमासे यांना पराक्रम पदक मिळाले आहे. 

Web Title: '26 / 11 ', the honor of the mighty officer of the muharur after a decade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.