गतवर्षात २६ कोटींचा ऐवज चोरीला, नवी मुंबईसह पनवेलमध्ये मालमत्ता चोरीचे २२८० गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 05:03 AM2019-02-04T05:03:32+5:302019-02-04T05:03:48+5:30

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षात मालमत्ता चोरीचे २२८० गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये एकूण २६ कोटी ५७ लाख ३७ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे.

26 crore stolen in last year, 2280 cases of property theft in Navi Mumbai including Panvel | गतवर्षात २६ कोटींचा ऐवज चोरीला, नवी मुंबईसह पनवेलमध्ये मालमत्ता चोरीचे २२८० गुन्हे

गतवर्षात २६ कोटींचा ऐवज चोरीला, नवी मुंबईसह पनवेलमध्ये मालमत्ता चोरीचे २२८० गुन्हे

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई  - पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षात मालमत्ता चोरीचे २२८० गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये एकूण २६ कोटी ५७ लाख ३७ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. २०१७ च्या तुलनेत गतवर्षात घडलेले हे गुन्हे ४७८ ने अधिक आहेत.
नवी मुंबईच्या वाढत्या शहरीकरणाबरोबरच गुन्हेगारीच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत झोपड्यांमध्ये गुन्हेगारांना आश्रय मिळत आहे. तर इतर शहरांमधील गुन्हेगारही नवी मुंबईकडे लक्ष केंद्रित करू लागले आहेत, यामुळे सोनसाखळी चोरी, घरफोडी, लूट अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत गतवर्षात अशा प्रकारच्या मालमत्ताचोरीचे सर्वाधिक गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये दरोडा, घरफोडी, चेनचोरी यासह वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. २०१७ मध्ये अशा प्रकारचे मालमत्ताचोरीचे १८०२ गुन्हे घडले होते. मात्र, गतवर्षात त्यात ४७८ ने वाढ होऊन २२८० गुन्हे घडले आहेत. यावरून तत्कालीन पोलीस आयुक्त शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

गतवर्षात घडलेल्या या गुन्ह्यांमध्ये रात्रीच्या ३६१ व ९९ अशा एकूण ४६० घरफोडीच्या घटना घडल्या आहेत, त्यामध्ये एकूण ५ कोटी ८९ लाख २० हजार ७६६ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे, तर वाहनचोरीच्या ८४३ घटनांमध्ये ९ कोटी ५१ लाख ५ हजार १७३ रुपये किमतीची वाहने चोरीला गेली आहेत. घरफोडी, चेनचोरी तसेच वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न झाले आहेत. अनेक सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गतही कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र, यानंतरही गत कालावधीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपेक्षित यश आलेले नसल्याचे एकूण गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे; परंतु गतवर्षाच्या अखेरीस संजय कुमार यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर दिला. त्याशिवाय नागरिक आणि पोलीस यांच्यात निर्माण झालेली दरी भरून काढण्याचाही प्रयत्न केला आहे, तर घडलेले गुन्हे उघड करून पकडलेल्या गुन्हेगारांवर न्यायालयात दोषसिद्ध करण्याचेही प्रमाण वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित
केले आहे.

पकडलेल्या गुन्हेगारांकडून चोरीचा मुद्देमाल जप्तीचे प्रमाण वाढविण्याची गरज

गुन्हे प्रकटीकरणाच्या बाबतीत पोलीस फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत, त्यामुळे मालमत्तांच्या एकूण २२८० गुन्ह्यांपैकी ८७४ गुन्हे उघडकीस आले आहेत. या एकूण गुन्ह्यांमध्ये २६ कोटी ५७ लाख ३७ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व वाहने व इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. नवी मुंबई पोलिसांनी त्यापैकी ९७४ गुन्ह्यांची उकल करून सात कोटी ९६ लाख १३ हजार ४२९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. गेलेल्या मुद्देमालापैकी हस्तगत मुद्देमालाचे गतवर्षाचे प्रमाण ३० टक्के आहे.

अनेकदा मुला-मुलींच्या भविष्यासाठी पालक दागिन्यांच्या स्वरूपात गुंतवणूक करून ठेवत असतात. अशातच त्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्यास संपूर्ण कुटुंबापुढे आर्थिक संकट निर्माण होत असते. मात्र, गुन्हेगाराला अटक केल्यानंतरही त्याच्याकडून फारसा ऐवज परत मिळत नाही.

चोरीच्या मालाची विल्हेवाट लावली गेलेली असते, अथवा त्याच्याकडून जप्ती मिळवण्यात पोलीस कमी पडतात. परिणामी, गुन्हा उघडकीस येऊनही संबंधितांना त्यांचा गेलेला ऐवज परत मिळत नाही, अथवा कमी प्रमाणात मिळतो.चोरीच्या मुद्देमालाची जप्ती वाढविण्याची गरज आहे.

Web Title: 26 crore stolen in last year, 2280 cases of property theft in Navi Mumbai including Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.